पुणे : राज्यात आतापर्यंत ७० टक्के गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. खासगी संस्थांनी केलेल्या लसीकरणामुळे हा आकडा एक कोटींच्या पुढे गेला आहे. यामुळे बाधितांचा तसेच मृतांचा आकडा कमी होत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
या महामारीच्या १० ते १५ दिवसांच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत, असेही सिंह म्हणाले. राज्यात आतापर्यंत १२५७ जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला असून, ३५ हजार ७१० जनावरे बाधित झाली. त्यापैकी १६ हजार ३०२ जनावरे उपचाराअंती पूर्ण बरे झाली आहेत.
राज्यात गुरुवारअखेर एकूण १०६.६२ लाख लसी उपलब्ध केल्या आहेत. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २०२३ गावांतील ४८.२८ लाख आणि परिघाबाहेरील ३८.९१ लाख अशा एकूण ८७.१९ लाख जनावरांचे मोफत लसीकरण केले आहे. सर्वाधिक बाधित असलेल्या जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले असून, इतर जिल्ह्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण अंतिम टप्प्यात आहे.
खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एक कोटी अर्थात सुमारे ७० टक्के गोवंशीय जनावरांचे लसीकरण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील तीन ते चार दिवसांमध्ये बाधित पशुधनाच्या संख्येत, तसेच बाधित होणाऱ्या गावांच्या संख्येत घट दिसून येत आहे.
राज्यात ३१ जिल्ह्यांमधील एकूण २०२३ गावांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३५ हजार ७१० बाधित जनावरांपैकी १६ हजार ३०२ जनावरे उपचाराने बरे झाले आहे. गुरुवारपर्यंत एकूण १२५७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानिहाय मृत्यू
जळगाव १९१, नगर १२३, धुळे २५, अकोला २०९, पुणे ८३, लातूर १३, औरंगाबाद ३५, बीड ३, सातारा ९१, बुलडाणा १४७, अमरावती १५५, उस्मानाबाद ४, कोल्हापूर ७७, सांगली १५, यवतमाळ २, सोलापूर १२, वाशिम १३, नाशिक ४, जालना १२, पालघर २, ठाणे १६, नांदेड १०, नागपूर ३, हिंगोली १, रायगड ४, नंदुरबार ५ व वर्धा २.
''बहुतांश मृत्यू हे आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे संबंधित झाले आहेत. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून, बहुतांश पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. - सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धविकास''