पुणे : लम्पी रोगामुळे जिल्ह्यात १६३ गावांतील ४ हजार २२३ जनावरे बाधित झाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने लसीकरण हाती घेत ८ लाख २८ हजार जनावरांचे अर्थात, १०० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित क्षेत्राबाहेर अधिक वाढला नसून, आजवर ८२७ जनावरे या रोगामुळे सक्रिय आहेत. जिल्ह्यात वेळेवर उपाययोजना केल्याने १८४ जनावरे दगावली असून, मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
जिल्ह्यात पशुधनातील लम्पी चर्मरोगाची प्रकरणे आढळून येताच, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी तातडीने ८ सप्टेंबरला लम्पी संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र घोषित केले. त्यानंतर, राज्यातही हाच निर्णय लागू करण्यात आला. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी-विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तत्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लम्पीबाबत तज्ज्ञांच्या ५ टीम बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण हाती घेतले.
जिल्ह्यातील एकूण जनावरांपैकी ३ हजार १४५ जनावरे बरी झाली असून, १८४ दगावली आहेत, तर सक्रिय जनावरांपैकी ६४ गंभीर आजारी आहेत. लम्पीमुळे मृत्यू झालेल्या १२८ जनावरांच्या मालकांना ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली. लसीकरणानंतर पशुधनातील आजाराची गुंतागुंत होत नसून, जनावरे बरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक १ हजार १७२ जनावरे बाधित झाली होती. त्या खालोखाल बारामती ६८३, खेड ६७४, जुन्नर ३६३, दौंड ३२४, हवेली २७८, शिरुर २७१, मावळ १५९, पुरंदर १२२, आंबेगाव १०१, मुळशी ६१, भोर १४, तर वेल्ह्यामध्ये एक जनावर लम्पीने बाधित झाले होते, अशीही माहिती विधाटे यांनी दिली.