लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोन्याच्या मूर्तीची स्वस्तात विक्री करण्याच्या बहाण्याने शनिवार पेठेतील सराफाला दोघांनी २१ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.
याप्रकरणी नीलेश सदाशिव धुमाळ (वय ३१, रा. स्वरा अपार्टमेंट, हनुमाननगर, कात्रज) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सराफ व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार सराफ व्यावसायिकाची शनिवार पेठेत सराफी पेढी आहे. आरोपी धुमाळ आणि सराफ व्यावसायिकाची ओळख आहे. मित्राकडे सोन्याची मूर्ती असून, स्वस्तात विक्री करायची आहे, अशी बतावणी धुमाळने काही दिवसांपूर्वी सराफ व्यावसायिकाकडे केली होती. त्यानंतर धुमाळ आणि त्याचा मित्र सराफी पेढीत आले. त्यांनी सराफ व्यावसायिकाला मूर्ती दाखविली. तपासणीत मूर्तीत सोन्याचा अंश असल्याचे आढळून आले. धुमाळ आणि साथीदाराने २१ लाखांमध्ये मूर्तीविक्रीचा व्यवहार केला. पैसे घेतल्यानंतर दोघेजण मूर्ती घेऊन सराफी व्यावसायिकाकडे आले. मूर्ती सराफाकडे सोपवून दोघेजण पसार झाले. सराफ व्यावसायिकाने पुन्हा मूर्तीची तपासणी केली. तेव्हा सोन्याचा अंश नसल्याचे आढळून आले. पसार झालेल्या धुमाळला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे तपास करत आहेत.
---