लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भिशी योजनेत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्यात येईल, अशा आमिषाने मार्केट यार्डातील फूल व्यापाऱ्याची ६७ लाख ३२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हिरेन ट्रेडिंग कंपनीचे भरत जोशी, हिरेन जोशी, दीपक जोशी यांच्या विरोधात फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंरक्षण अधिनियम या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद माने (वय ५३, रा. तानाजीनगर, धनकवडी) यांनी यासंदर्भात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने यांचा मार्केट यार्डात फूल व्यापारी आहे. हिरेन जोशी यांचा मार्केट यार्डात हिरेन ट्रेडिंग कंपनी बारदान विक्रीचा व्यवसाय आहे. माने यांची जोशी यांच्याबरोबर ओळख होती. पाच वर्षांपूर्वी भरत, त्यांची मुले हिरेन आणि दीपक यांनी त्यांच्या भिशी योजनेत माने यांना गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्या वेळी गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्यात येईल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात जोशी यांच्याकडून माने यांना परतावा मिळाला. वर्षभरापूर्वी माने यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी माने यांच्याबरोबर संपर्कही टाळला. त्यांनी भिशी योजना बंद केली असून, मार्केट यार्डातील अन्य व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले असल्याचे माने यांना समजले. जोशी यांनी ६७ लाख ३२ हजार ३९० रुपयांची फसवणूक केल्याचे माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक के. बी. भालेराव तपास करत आहेत.
---