पिंपरी : वित्त संस्थेकडून कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एक लाख ११ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली आहे. हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, नारायण दास असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण दास या आरोपीने अशोक कुंभार (वय ५१, रा. थेरगाव, चिंचवड) या फिर्यादीला मोबाइलवर संपर्क साधला. वित्तसंस्थेतून कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले. वेळोवेळी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडे पैशांची मागणी करून २६ एप्रिल २०१५ ते ११ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत नारायण दास या नावाने एका बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार एकूण एक लाख ११ हजार ३०० रुपये कुंभार यांनी दास यांच्या खात्यावर जमा केले. एवढी रक्कम भरूनही त्यांना कर्ज मिळू शकले नाही. त्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी दास याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. टाळाटाळ होऊ लागल्याने आपली फसवणूक झाली हे कुंभार यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
कर्जाच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा
By admin | Published: November 15, 2016 3:11 AM