पुणे : इंग्लडमधील कंपनीत स्टोअर्स मॅनेजरच्या नोकरीचा मोह एका उच्चशिक्षित तरुणाला चांगलाच महागात पडला. नोकरी तर मिळाली नाहीच, उलट चोरट्यांनी त्याला तब्बल ४ लाख ६७ हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी माणिकबाग येथे राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी याने एमएससीचे शिक्षण इंग्लडमध्ये घेतले आहे. एक वर्षापूर्वी तो भारतात परत आला होता. भारतात आल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी त्याने आपली माहिती ऑनलाईन अपलोड केली होती. २४ फेब्रुवारी रोजी त्याला एक ई-मेल आला. त्यात त्याला इंग्लंडमधील एका नामांकित कंपनीत स्टोअर्समध्ये मॅनेजरची नोकरी देतो, असे सांगण्यात आले. इंग्लंडमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यानंतर नोकरीसाठी व्हिसाची प्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून प्रत्येकवेळी बँक खात्यावर पेसे भरायला सांगण्यात आले. ते म्हणतील, त्याप्रमाणे फिर्यादीने एकूण ४ लाख ६७ हजार रुपये भरले़ तरी त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.