पुणे : सरकारी टेंडर मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महादेव बलभिम शिंदे (वय- ५४, रा. पर्वती) यांनी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडला. फिर्यादीत म्हटल्यानुसार शिंदे यांना अनोळखी ई-मेल आयडीवरून मेल आला. सौदी अरेबियातील नामांकित कंपनीतून एजंट बोलत असल्याचे भासवले. २० हजार सोलर पॅनल साठी सरकारी टेंडर असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादींनी टेंडर घेण्यास सहमती दिल्यावर त्यांना रजिस्ट्रेशन फी, टेंडरची प्रोसेसिंग फी, ऍक्सेप्टन्स, ऍडव्हान्स रक्कम, लीगलायझेशन आणि स्टॅम्प ड्युटी अशी अनेक कारणे सांगून वेळोवेळी पैश्यांची मागणी केली.
त्यानंतर खोटी कागदपत्रे पाठवून फिर्यादींकडून २६ लाख ५५ हजार रुपये उकळले. काही कालावधीनंतर टेंडर दिले नाही म्हणून विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींना लक्षात आले. तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर पुढील तपास करत आहे.