पुणे : सायबर फसवणुकीमध्ये शहरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण एक कोटीची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. २५) संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, केसनंद रस्ता परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून एकूण ४५ लाख ७ हजार रुपये उकळले. त्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळगावकर करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, टिंगरेनगर परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला मोबदला देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादींनी ४४ लाख ५० हजार रुपये भरल्यावर परतावा देण्यास बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक साळुंखे हे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, धानोरी परिसरातील एका ४९ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांनी महिलेला संपर्क करून स्टॉक ट्रेडिंगमध्ये पैसे कमावता येतील, असे सांगितले. त्यासाठी महिलेकडून ७ लाख २६ हजार रुपये घेतले. मात्र, कोणताही नफा न देता फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक साळुंखे करत आहेत.
चौथ्या घटनेत, वाघोली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयपीओ काढून देतो आणि स्टॉक मार्केट टीप्समार्फत आर्थिक फायदा करून देतो, असे सांगत फिर्यादीकडून ६ लाख ८७ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळगावकर करत आहेत.