पुणे : एम.फिलला मानधन प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.ला सलग करून मानधन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच नवे शैक्षणिक धोरण लागू होईपर्यंत एम.फिलच्या विद्यार्थ्यांचा समावेश जाहिरातीत केला जाईल, असे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संचालक मंडळाच्या बुधवारी (दि. १४) झालेल्या बैठकीवेळी संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन पुन्हा एकदा आपल्या मागण्या मांडल्या. त्यातील अनेक निर्णयांवर संचालक मंडळाने सकारात्मकता दर्शवून त्या मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आधारवड ठरलेल्या सारथीला विद्यार्थ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरलेला होता. याविरोधात वेळोवेळी आंदोलन करूनही याची दखल घेतली जात नव्हती. संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारकडे पाठपुरावा करून संस्थेला स्वायत्तता मिळवून दिली. परंतु, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार होत नव्हता. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांना मानधन बहाल केल्याच्या दिनांकापासून पुढे ५ वर्ष मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी नोंदणी दिनांकापासून ५ वर्ष किंवा बहाल दिनांकापासून ५ वर्ष यापैकी जी दिनांक आधी येईल त्या कालावधीपर्यंत मानधन दिले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. ते आता थांबणार आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, गणेश मापारी व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अजय पवार, दैवत सावंत उपस्थित होते. या निर्णयाबद्दल सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे आभार मानले.
फोटो : संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सारथी संचालक मंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत मान्य केल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
फोटो - सारथी