कोरोनाच्या प्रतिकारासाठी सरसावली महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन
लोकमत न्यूज नेटवर्क
दीपक मुनोत
पुणे : कोरोना महामारीचा प्रतिकार करण्यासाठी ʻमहाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनʼ ही अस्थिरोगतज्ज्ञांची शिखर संस्था पुढे सरसावली आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये, सदस्यांना कोरोना प्रतिबंधक विविध उपाययोजनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत सखोल माहिती देण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अजित शिंदे आणि प्रख्यात तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांनी ʻलोकमतʼला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
प्रश्न : संस्थेच्या यंदाच्या सप्ताहाचे वैशिष्ट्य कायॽ
डॉ. अजित शिंदे : ʻकोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरील विजयासाठीʼ, ही संस्थेची यंदाची संकल्पना असून २ ते ९ मे दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, सामूहिक प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण, योग्य औषधांचा योग्य वेळी उपयोग, प्लाझ्मादान, रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी मानसोपचार, तर मन:शांतीसाठी आध्यात्मिक व्याख्यान, अशा विविध उपक्रमांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. डॉ. रमण गंगाखेडकर यांनी या सप्ताहाचे उद्घाटन केले. डॉ. संचेती यांनी त्यांच्या कार्यकालापासून सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाचा लाभ आज दररोज सरासरी १२०० डॉक्टर्स घेत आहेत.
प्रश्न : सध्या महामारीमुळे असलेल्या निर्बंधांच्या जमान्यात शारीरिक तंदुरुस्ती कशी राखावीॽ
डॉ. पराग संचेती : व्यायामासाठी जिम अथवा बाहेर फिरायला जाण्यासही पर्याय आहेत. तुम्ही सूर्यनमस्कार, जोर बैठका, ट्रेड मिल, स्टॅटिक सायकल असे साधे सोपे पर्याय निवडू शकता. व्यायामामुळे रोगप्रतिकारकशक्ती प्रचंड वाढते. स्वस्थ शरीराबरोबरच स्वस्थ मनासाठी ध्यानधारणाही आवश्यक आहे.
प्रश्न : सध्या गृहिणींवरील घरकामाचा ताण वाढल्याने त्यांनी कशी काळजी घ्यावीॽ
डॉ. अजित शिंदे : महिलांना प्रामुख्याने पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून अनेक व्यायामप्रकार आहेत. फिजिओ थेरेपिस्ट अथवा जिम ट्रेनर ऑनलाइन शिकवू शकतात.
प्रश्न: वर्षभर शाळा बंद असल्याने मुलांचे खेळणे बंद झाले आहे. त्यांच्यासाठी काय सुचवालॽ
डॉ. पराग संचेती : वर्षभरात ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. शाळा-महाविद्यालये बंद, शारीरिक श्रम नाहीत अशा परिस्थितीत मुलं सोशल मीडियाच्या व्यसनाला बळी पडत आहेत. अशा वेळी पालकांची जबाबदारी सर्वाधिक आहे. त्यांना घरीच व्यायाम करण्यास प्रवृत्त करा. ध्यानधारणा, स्मरणशक्ती वाढवणे, बैठे खेळ असे पर्याय द्या.
मुलं फार फार तर ३० मिनिटे एकाग्र होऊ शकतात, असे सर्वेक्षण आहे. असे असताना घरी, ऑनलाइन शिक्षण घेताना एकाग्रता टिकवून ठेवणे, हे एक मोठे आव्हान आहे. मात्र पालकांना बारकाईने लक्ष घालून मार्ग काढावा लागेल. आता पालकांना शिक्षकांवर जबाबदारी ढकलता येणार नाही.
प्रश्न : ज्येष्ठांनी काय काळजी घ्यावीॽ
डॉ. अजित शिंदे : वृध्दापकाळामुळे हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडण्याचा मोह टाळावा. प्राणायामासारखे श्वसनाचे व्यायाम करावेत. पौष्टिक आहाराबरोबरच सुकामेव्यावर भर द्यावा.
चौकट
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनो सावधान
वर्क फ्रॉम होम, आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र चुकीच्या बैठकीमुळे पाठ, कंबर, मान, हाताला मुंग्या येणे, गुडघेदुखीसारख्या व्याधी मूळ धरू शकतात. ते टाळण्यासाठी बैठक कशी असावी ते समजावून घेत कसोशीने पालन करा. प्रसंगी अर्गोनिक चेअर वापरा. ५० मिनिटांच्या बैठकीनंतर २/३ मिनिटांचा ब्रेक घ्या. बसल्या बसल्या काही व्यायाम करणे शक्य आहे, ते समजावून घ्या आणि करा. सकाळी सकाळी वॉर्मअप एक्झरसाइज करा. अशी काळजी घेतल्यास ‘वर्क फ्रॉम होमʼचे वाईट परिणाम टाळता येतील, असे डॉ. शिंदे आणि संचेती यांनी सांगितले.