लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील साफसफाई आणि स्वच्छता याबाबतीतील ठेकेदारी नवीन संस्थेस मिळाल्याने ‘रयत संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्णालय परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सुमारे १०० हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. संबंधित कर्मचारी मनोरुग्णालय परिसरातील साफसफाई करणे, अंतर्गत विविध वॉर्डांमधील स्वच्छता करणे, रुग्णालय परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हाऊसकिपिंंग आदी प्रकारची कामे करीत होते. गेल्या चार वर्षांपूर्वी मोनाळकर या ठेकेदाराकडे संबंधित महिला स्वच्छता कामगार काम करीत होत्या. गेल्यावर्षी मात्र रयत या खासगी संस्थेला स्वच्छतेच्या कामाचा ठेका मिळाला होता. त्यांच्याकडेही हेच कामगार काम करीत होते; मात्र आता १ जूनपासून लोकराज्य संस्थेकडे येथील स्वच्छता कामाची ठेकेदारी मिळाली आहे. त्यामुळे त्या संस्थेमार्फत नवीन स्वच्छता कामगार भरले जाणार असल्याचे समजते. परिणामी, जुन्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची उपासमार सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. मधुमिता बहाले यांनी सांगितले की, ठेकेदारी बदलल्याने नव्या ठेकेदाराने कोणते कामगार ठेवायचे हा त्यांचा प्रश्न असून, त्याचा रुग्णालय प्रशासनाशी संबंध नाही.या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांनी मनोरुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्या ठिकाणी येरवडा पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यानंतर दुपारच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अरुण गौड आणि कामगार युनियन संघटनेचे पदाधिकारी वसंत पवार यांची कामगारसंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये बैठक झाली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा
By admin | Published: June 02, 2017 2:37 AM