पुणे : इतिहासात चंदनही आहे, कोळसाही आहे. त्यामुळे त्यातील नेमके काय घ्यायचे हे आपण ठरवायला हवे, एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसे इतिहास निर्माण करतात. युवक-युवतींनी रायगडाचे दर्शन आयुष्यात एकदातरी घ्यायला हवे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया ‘किल्ले रायगड’ वर ५० वर्षांपूर्वी केलेला दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना प्राप्त झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात लघुपटाचे प्रदर्शन केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून हा लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटाचे दिग्दर्शन माधव शिंदे यांनी केले होते. त्या वेळी त्याची अवस्था खराब होती. परंतु, संग्रहालयाने तांत्रिक सोपस्कार करून तो लघुपट प्रदर्शनासाठी तयार केला. या वेळी बाबासाहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला.बाबासाहेब म्हणाले, की ६ दिवस रायगडावर मुक्काम करून आम्ही हा लघुपट तयार केला. या लघुपटामध्ये ऐतिहासिक प्रसंगांची चित्रे दाखविण्याची कल्पना लतादीदींची होती. या लघुपटाला हृदयनाथ मंगेशकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.रायगडाबद्दल ते पुढे म्हणाले, देशद्रोही, राजद्रोही लोकांना रायगडावरून कडेलोट केले जायचे. मात्र, किल्ला शिवाजीमहाराजांच्या ताब्यात आल्यानंतर एकही कडेलोट झाला नाही. महाराजांच्या काळात एकही राजद्रोह झाला नाही. १८१८ ते १८८० या काळात रायगडावर जाण्यास बंदी घातली. तरुणांमध्ये स्वराज्याची प्रेरणा पुन्हा जागृत होऊ नये, यासाठी ही बंदी घातली होती. रायगडावर विजय मिळविल्यानंतर औरंगजेबाने रायगडाचे नाव बदलून इस्लामगड असे केले होते. त्याला तो उत्तमगडही म्हणत असे.कोणतीही चूक होऊ नये असे त्यांना वाटत होते...इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना त्यांनी रायगडाला भेट दिली होती. त्या वेळची आठवण सांगताना बाबासाहेब म्हणाले, ‘इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या, तेव्हा माहिती सांगण्यासाठी मी त्यांच्यासोबत होतो. त्या वेळी रायगडाबद्दल त्यांना फारशी माहिती नसल्याने येथील परंपरा, वागण्याची पद्धत सांगण्याची विनंती केली. जेणेकरुन त्यांच्याकडून कुठलीही चूक होऊ नये असे त्यांना वाटत होते.’
वेडी माणसे इतिहास घडवतात - बाबासाहेब पुरंदरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:50 AM