पुणे : लोकसभेसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार अभिनेत्री माधुरी दीक्षित असणार, या चर्चेला आता बरेच राजकीय धुमारे फुटू लागले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या ‘यासंबंधी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेने जोर धरला असून, त्यात जागा डेंजर झोनमध्ये असल्यानेच सेलिब्रेटीचा उपयोग करून घेण्याची चाचपणी केली जात असल्याचे बोलले जात आहे.भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा मध्यंतरी माधुरी दीक्षित यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. भाजपाच्या जनसंपर्क अभियानात ही भेट झाली होती. त्या वेळेपासून दीक्षित यांना पुणे लोकसभेची जागा लढवण्यासाठी शहा गळ घालणार अशी चर्चा सुरू झाली. शहा यांच्याकडे दर तीन महिन्यांनी देशातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा अहवाल जात असतो. त्यात पुणे लोकसभेची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे पक्षातीलच काही जबाबदार पदाधिकारी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर छातीठोकपणे सांगत असतात.
विरोधी पक्षातही याची चर्चा आहे. भाजपाला आतापासूनच पराभवाची भीती भेडसावू लागली आहे. अभिनेत्रींना निवडणुकीच्या रिंगणात आणण्याची त्यांची हौस आता देशभर चर्चेचा विषय झाली आहे. हेमामालिनी, स्मृती इराणी, किरण खेर अशा अभिनेत्रींना त्यांनी लोकसभेची उमेदवारी देत निवडून आणले आहे. स्मृती इराणींना तर केंद्रीय मंत्रिपदही दिले असून, त्यांच्याबाबत वादविवाद झाल्यानंतरही फक्त खाते बदलून मंत्री म्हणून कायम ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून माधुरी दीक्षित यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे विरोधकांमध्ये बोलले जात आहे.
चाचपणीसाठी नावाची टोपी उडवली...विद्यमान खासदार अनिल शिरोळे तब्बल साडेतीन लाख मतांनी विजयी झाले आहेत. मात्र त्यांनी नंतर जनसंपर्क ठेवला नाही. लोकसभेत त्यांनी पुणे शहराचे काही प्रश्न मांडलेत असे झालेले नाही. मध्यंतरी पाण्याच्या प्रश्नावर महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यामुळे तर सत्तेत असूनही तुम्हीच उपोषण करणार असाल तर काय, अशी टीकाही त्यांच्यावर झाली.या सर्व गोष्टींची माहिती असल्यामुळेच एकेका जागेसंबधी अत्यंत जागरूक असलेल्या शहा यांनी अशी चाचपणी सुरू केली आहे. पुण्यातून माधुरी दीक्षित यांना उमेदवारी दिली तर त्याचा काय परिणाम होईल, याची चाचपणी करण्यासाठी त्यांनीच त्या नावाची टोपी उडवली असल्याचे सांगण्यात येत आहे.