Pune: पर्वतीत ३ टर्म निवडून आलेल्या मिसाळांना चौथ्यांदा उमेदवारी; 'मविआ' मध्ये जागेचा तिढा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:28 PM2024-10-22T15:28:49+5:302024-10-22T15:31:15+5:30
पर्वती मतदारसंघात परिवर्तन होणार की चौकार मारून इतिहास रचला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म निवडून आलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांना भाजपने चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत मात्र ही जागा कोणाकडे राहणार, हे अद्याप जाहीर झाले नाही. जागावाटपानंतर उमेदवार जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तन होणार की चौकार मारून इतिहास रचला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ २००४ पर्यंत अनुसूचित जातीसाठी राखीव होता. २००४ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे रमेश बागवे विजयी झाले होते. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाला. या मतदारसंघात मध्यमवर्गीयांसह ‘हाय प्रोफाइल’ सोसायट्या आणि मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी भागाचाही समावेश आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचे प्रमाण जास्त असलेला सहकारनगर, लक्ष्मीनगर, मित्रमंडळ, पर्वती दर्शन परिसर आणि सॅलिसबरी पार्क, मार्केट यार्ड, वडगाव बुद्रुक, हिंगणे, जनता वसाहत, दत्तवाडी हा झोपडपट्टी बहुल प्रभाग या मतदारसंघात येतो. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते; पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत या मताधिक्यात घट होऊन ते ३६ हजार ७२८ झाले.
सन २०१९च्या निवडणुकीत पर्वती मतदारसंघात एक लाख ७३ हजार ७२८ मतदान झाले होते. त्यामध्ये २५० पोस्टल मतांचा समावेश आहे. यापैकी मिसाळ यांना ९७ हजार १२ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती; तर काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला, तरी हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या मतदारसंघावरून जागेचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेसचे आबा बागुल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अश्विनी कदम, सचिन तावरे, इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक कोंडी अन् झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न
पर्वती विधानसभा मतदारसंघात झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवावी. डोंगर माथा डोंगर उतारा झोन प्रस्तावित केला आहे. त्यावर बांधकामाला परवानगी नाही; पण अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत. वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. या मतदारसंघाच्या काही भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होताे, ताेही प्रश्न गंभीर आहे.