पुणे : महामार्गापासून ५०० मीटर अंतराआतील मद्यालये बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आणखी स्पष्टता आल्याने शहर हद्दीतील सर्व मद्यालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाने परवाना पोचपावती देण्यास मंगळवारपासून (दि. ५) सुरुवात केली असून, बुधवारी सायंकाळपर्यंत ३७० मद्यालयांना पावती देण्यात आली.मंगळवारी आणि बुधवारी दिवसभर शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बार चालकांनी कागदपत्रांची पूर्तता केली. जिल्ह्यात २ हजार ४०० बार आणि वाईन शॉप आहेत. त्यांपैकी १ हजार ६०० वाईन शॉप आणि बार न्यायालयाच्या निर्णयामुळे बाधित झाले होते. त्यातील ३७० व्यावसायिकांना बुधवारी सायंकाळपर्यंत परवान्याची पोचपावती देण्यात आली आहे. त्यात ५९ नगरपालिका आणि १७ कॅन्टोन्मेंट परिषद हद्दीतील मद्यालयांचा समावेश असल्याची माहिती राज्य उत्पादनशुल्क विभागाचे अधिीक्षक मोहन वर्दे यांनी दिली.पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५५४ वाईन शॉप आणि बार होते. त्यातील ८१ टक्के व्यावसायिकांना फटका बसला होता. मार्चअखेर सर्वच मद्य विक्रेत्यांनी परवाना शुल्काचे पैसे भरले होते. त्यामुळे आता पोचपावती दिल्यानंतर ते तत्काळ मद्यालये सुरू करू शकतात. बुधवारी जवळपास साडेतीनशे मद्यालये सुरू झाली होती.
मद्यालये पुन्हा सुरू, परवाना नूतनीकरण सुरू : दोन दिवसांत पावणेचारशे जणांना परवाना वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:15 AM