‘फ्लॅट’वरही ताबे : जागेसंदर्भातली वाढली गुन्हेगारी
विवेक भुसे
पुणे : उपनगरालगतच्या भागात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यातूनच काही दशकांपूर्वी घेतलेल्या भूखंडाला (प्लॉट) मोठा भाव आला आहे. असे भूखंड ‘लॅडमाफियां’कडून बळकाविण्याचे प्रकार वाढले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ७७ भूखंड हडपण्याचे गुन्हे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये घडले आहेत. याशिवाय भाडेकरूंशी संगनमत करून ज्येष्ठ नागरिकांच्या सदनिका (फ्लॅट) बळकाविण्याचेही प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात घडत आहेत.
शहरात आता रिकामे भूखंड कमी राहिले आहेत. असे असले तरी भूखंड बळकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सन २०१९ मध्ये ३४ गुन्हे दाखल झाले. लॉकडाऊन असल्याने सन २०२० मध्ये ही संख्या घटून वीसवर आली. मात्र, यंदा पुन्हा अवघ्या सहा वर्षांतच भूखंड बळकावल्याचे २३ गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
शहराची हद्द दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात राहणे परवडत नसल्याने नागरिक दूरवर एक-दोन गुंठे जमीन घेऊन कालांतराने तेथे घर बांधण्याचे स्वप्न पाहात असतात. काही वर्षांपूर्वी गुंठेवारीने घेतलेली जागा पडून असते. शहर वाढत असल्याने त्यांच्या जागेची किंमत वाढत जाते. त्यातूनच ‘लँडमाफियां’चे लक्ष त्याकडे जाते. मूळ जमीनमालकाच्या नातू, पणतू किंवा अन्य नातेवाईकांना पुढे करून कुलमुखत्यारपत्र घेऊन जमिनीवर कब्जा केला जातो. त्यातून कायदेशीर अडचणी वाढतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी लाखो रुपयांची वसुली केली जाते. पैसे न दिल्यास सामान्य जमीनमालकाला प्रचंड मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रसंगी शारीरिक इजाही पोहोचवली जाते.
पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, अनेक जण कच्च्या ले-आऊटमधील भूखंड घेतात. जमीन मालक एकापाठोपाठ एक भूखंड विकतात. त्यातून सात-बारामध्ये जमीन वजा होत जाते. भूखंड पाडताना रस्ता व इतर अॅमेनिटीसाठी जागाच ठेवली जात नाही. त्यातून जेव्हा ते विकसित करण्यास सुरुवात होते. त्यावेळी रस्ता व इतर अॅमेनिटीसाठी जागा सोडण्यावरून भूखंड मालकांमध्ये वाद सुरू होतात. अनेक जण केवळ खरेदीखत करतात. पण, त्याची नोंद ७ /१२ वर करून घेत नाही. त्यातून मग न्यायालयीन लढा सुरू होतो. त्याचा सर्वांनाच त्रास होतो.
अनेक जण भूखंड घेतल्याचे खरेदीखत करतात. त्यानंतर त्या जागेवर आपला हक्क कायदेशीररीत्या प्रस्थापित करण्यासाठी पुढे काही करत नाही. अशावेळी मग काही जण जुन्या ७/१२च्या आधारे तोच भूखंड दुसऱ्याला विकतात. त्यातून त्रास सुरू होतो. त्यासाठी भूखंड घेतल्यानंतर तातडीने ७/१२वर आपले नाव लावून घेणे महत्त्वाचे असते.
चौकट
भूखंड हडपल्याच्या तक्रारी
२०१९ - ३४
२०२० - २०
जून २१ अखेर - २३
चौकट
भूखंडाची मालकी राखण्यासाठी
-मंजूर ले आऊट, एनए झालेला अथवा टीपी स्कीम झालेलाच प्लॉट घ्या.
-विकत घेतलेल्या प्लॉटचे संरक्षण करण्यासाठी त्याला कुंपण घालावे.
-आपल्या जागेच्या मालकीबाबतचा बोर्ड त्या ठिकाणी लावावा.
-आपल्या जागेवर कागदोपत्रीही कोणी अतिक्रमण केले नाही ना, याची दर काही महिन्यांनी ऑनलाईन ७/१२ उतारा काढून तपासणी करावी.
चौकट
“मंजूर ले-आऊट असलेला एनए झालेला भूखंड खरेदी केल्यावर त्याचा तातडीने फेरफार करून त्याची नोंद ७/१२ वर करुन घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कष्टाच्या पैशातून खरेदी केलेल्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून आपणच काळजी घेणे जरुरीचे आहे.”
-पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त.