लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “माफियागिरी करणे हेच राज्य सरकारचे काम आहे. त्यासाठी त्यांना सचिन वाझेसारखा माणूस हवा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना वसुली करणारा माणूस हवा होता. वाझे त्यांच्या विश्वासातला माणूस, जुना शिवसैैनिक, त्यामुळे त्याच्या बचावासाठी सरकार पुढे सरसावले,” असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला.
“सचिन वाझेसारख्या एका साध्या पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी अजय मेहता यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालावर उध्दव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सह्या केल्या. जून २०२० मध्ये कडक लॉकडाऊन सुरु असताना सचिन वाझेचे १७ वर्षांचे निलंबन रद्द करुन त्याला परत कामावर रुजू करुन घेण्यात आले. सरकार याबाबतीत अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. उध्दव ठाकरेंनी ‘मी बेजबाबदार’चा बोर्ड गळयात घातला पाहिजे,” अशी टीका सोमय्या यांनी केली. पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सोमवारी (दि. १५) ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, २००४ मध्ये सचिन वाझेचे निलंबन झाले तेव्हा राज्याचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. नोव्हेंबर २००७ मध्ये त्याची याचिका फेटाळण्यात आली आणि राजीनामा द्यावा लागला, त्यावेळीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होते. मग २०२० मध्ये गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असतानाच अनिल देशमुखांना असा काय शोध लागला की, त्यांनी सचिन वाझेचा बचाव केला, असा प्रश्न सोमय्या यांनी केला.
चौकट
वाझेेचे विशेष काम कोणते?
एक सहाय्यक पोलीस निरिक्षक गुन्हे शाखेची गाडी घेऊन फिरतो आणि पोलीस महासंचालक परमवीर सिंग तीन दिवस त्याच्याशी काय ‘गुफ्तगू’ करतात? याचाच अर्थ सचिन वाझे त्याांचा विशेष कामाचा विशेष माणूस आहे. ते काम काय, हे आता जगाच्या समोर आले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
चौकट
सरकारकडे नाही कृती आराखडा
‘ससून’ रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था चांगली आहे. मात्र, मुंबई आणि इतर काही शहरात ठाकरे सरकारने विक्षिप्त नियोजन करुन ठेवले आहे. सरकारने लसीकरणाच्या केंद्रीकरणाचा घाट घातला आहे. एकेका केंद्रावर साडेचार-पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना बोलावले जाते. कोरोना पुन्हा अचानक वाढू लागला मात्र, तो का वाढतो याबाबत महाराष्ट्र सरकारने अभ्यासच केलेला नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीचा कोणताही कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.