पुणे : जादू हा लहान मुलांच्या कुतूहलाचा विषय.. कार्यशाळेच्या माध्यमातून हे जादूचे प्रयोग शिकता आले, तर त्यांना होणारा आनंद केवळ अवर्णनीय! हाच अवर्णनीय अनुभव रोटरी क्लब आॅफ इन्स्पिराच्या कार्यक्रमात आला आणि अवघे वातावरण जादूमय होऊन गेले. विख्यात जादूगार सतीश देशमुख यांनी मुलांना जादूचे प्रयोग दाखवून चकित केले आणि मुलांना काही जादूचे प्रयोग शिकवले. त्याच वेळी या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल मार्गदर्शनही केले.रोटरी क्लब आॅफ इन्स्पिरातर्फे ‘रायला’ या उपक्रमांतर्गत जागतिक साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जादूच्या प्रयोगांचा अनोखा उपक्रम बुधवारी वाघोली येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे तसेच युथ डिस्ट्रिक्ट डायरेक्टर शीतल शहा, इन्स्पिराच्या अध्यक्षा पीनल वानखेडे, डॉ. संध्या सूर्यवंशी, स्मिता विखणकर, रसिका चौैंदे, संगीता बाफना, सुनीता कटारिया, मोनालिसा दुसाने, अंकिता गुपचूप, सुरभी बाफना आदी मान्यवर उपस्थित होते. शांतीलाल मुथा यांनी स्थापन केलेल्या भारतीय जैैन संघटनेची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि भटक्या विमुक्त जातीच्या मुलांच्या आश्रमातील एकूण ५००० विद्यार्थी ‘मॅजिक वर्कशॉप’मध्ये सहभागी झाले होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि रोटरी क्लब आॅफ इन्स्पिरातर्फे या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सातवी ते दहावी आणि अकरावी, बारावी अशा दोन गटांमध्ये ‘माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी गौैरवण्यात आले. या वेळी शाळेतील १००० मुलींसाठी इन्स्पिरातर्फे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन भेट देण्यात आले.‘कलटी सपनों से’ या आगामी चित्रपटातील अभिनेता साईनाथ मुदणकर यानेही या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी जादूची किमया
By admin | Published: September 09, 2016 1:17 AM