पुणे : साठेबाजांवर सुरू झालेली कारवाई आणि इजिप्तचा कांदा बाजारात येऊ घातल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम जाणवू लागला आहे. सोमवारी घाऊक बाजारात कांद्याच्या भावात रविवारच्या तुलनेत १० किलोमागे ८० रुपयांची घट झाली. कांद्याचे भाव उतरू लागल्यामुळे बाजारात आणखी कांदा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढेही भाव कमी होत जातील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.शहरात कांद्याच्या गगनाला भिडलेल्या भावाने सर्वसामान्यांच्या डोळ््यांत पाणी आणले आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यासाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. अनेक हॉटेलमधून कांदा हद्दपार झाला आहे. मात्र, सध्या भाव उतरू लागल्याचे चित्र आहे. शासनाने नाशिक, लासलगावसह इतर भागांतील साठेबाजांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण केलेल्या साठेबाजांकडून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)आवक दुपटीने वाढलीइजिप्तहून आयात केलेला कांदा मुंबई बंदरात दाखल झाला आहे. हा कांदाही दोन-तीन दिवसांत पुण्यातील बाजारात दाखल होईल. कर्नाटकहून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. याच्या एकत्रित परिणामामुळे बाजारात कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे.गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी ८० ते ९० ट्रक कांद्याची आवक झाली होती. तर, प्रतिदहा किलोमागे ६०० ते ६८० रुपये भाव मिळाला होता. सोमवारीही ही आवक कायम राहिली. त्यातच केरळमधील ओनम सणासाठी असलेली मागणी सोमवारी कमी झाली. या सर्व बाबींच्या एकत्रित परिणामामुळे सोमवारी बाजारात कांद्याच्या भावात घट झाली. कांद्याला प्रतिदहा किलोमागे ५५० ते ६०० रुपये भाव मिळाला. कांद्याचे व्यापारी रितेश पोमण म्हणाले, की इजिप्तहून आलेला कांदा, कर्नाटकमधून सुरू झालेली आवक आणि साठेबाजांवर सुरू झालेल्या कारवाईमुळे बाजारात यापुढे कांद्याची आवक वाढत जाण्याची शक्यता आहे. परिमाणी, कांद्याचे भाव यापुढे कमी होत जातील. भाव उतरण्याच्या भीतीनेही साठवूण ठेवलेला कांदा बाजारात आणला जाईल.
महागलेला कांदा उतरू लागला
By admin | Published: August 25, 2015 5:05 AM