अंकुश जगताप, पिंपरी‘खा के पिओ, या पी के खाओ’ हे वाक्य अद्यापही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक घरांमध्ये कानावर पडतेय. का ते समजले असेलच! हो, कारण अद्यापही शहरात दुकानांमध्ये मॅगी खुलेआम, तर काही ठिकाणी गुपचूप विकली जात आहे. अनेक पालक ती खरेदी करून आपल्या मुलांना खाऊ घालत आहेत. लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत ही बाब उघडकीस आली आहे.परिणामी शहरातील चिमुरड्यांच्या आरोग्याभोवती मॅगीचा फास आणखीनच आवळला जात असल्याची गंभीर परिस्थिती समोर आली आहे.शिसे आणि इतर विषारी घटक आढळल्याने मॅगी नूडल्सच्या उत्पादनांवर देशभरात बंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मॅगीच्या विक्रीला ७ जूनपासून बंदी केल्याचे अन्न व औषध मंत्री गिरीष बापट यांनी जाहीर केले. त्यानुसार पुरवठा बंद करीत असल्याचे मॅगीचे उत्पादक नेस्ले कंपनीच्या प्रतिनिधींनी घोषित केले होते. त्यानुसार नव्याने पुरवठा होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र किराणा दुकानांमध्ये, स्वीट होममध्ये, टपऱ्यांमध्ये मॅगीची विक्री अद्यापही सुरूच असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले आहे. दुपारी ४ ची वेळ. कॅम्पाला सुटीचा दिवस असल्याने अनेक घाऊक बाजारातील किराणाची दुकाने बंद होती. मात्र किरकोळ विक्रेत्यांची दुकाने सर्वत्र सुरूच दिसली. त्यानुसार पिंपरी गावठाणामध्ये असणाऱ्या किराणा दुकानामध्ये लोकमतचा बातमीदार ग्राहक म्हणून गेला. ‘शेठजी नुडल्सचे पाकीट द्या’, असे म्हणताच दुकानदार बिचकला. नेहमीचे ग्राहक दिसत नाही म्हणून थोडा वेळ नीट पाहत राहिला. काय पाहिजे, असे त्याने पुन्हा विचारले. त्यावर बातमीदार म्हणाला, ‘‘लहान मुलं खातात त्या मॅगीसारख्या मॅगीसारख्या नुडल्स पाहिजेत.’’ दुकानदाराने सुरूवातीला इतर कंपन्यांच्या नुडल्स पुढे केल्या. त्या खरेदी केल्यावर बातमीदाराने मॅगी नुडल्स मिळतात काय, असं विचारले. दुकानदार सुरुवातीला दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘साहेब, मॅगी मिळायची कुठेच बंद नाही. आणि एक सांगा, इतकी वर्षे कसं कळालं नाही हो मॅगीत जहर आहे ते. आताच काय झालंय? आणि इतकं खराब असतं तर लोकांना त्रास झाला नसता काय?’’ अशा प्रश्नांची सरबत्तीच या दुकानदाराने सुरू केली. अखेर त्याचे बोलणे मध्येच थांबवून थेट मॅगी आहे काय, अशी विचारणा केली. त्यावर दुकानदाराने पैशाच्या गल्ल्याखाली ठेवलेल्या मॅगीच्या पाकिटांची माळ बाहेर काढत किती पुडे देऊ अशी विचारणा केली. त्यामध्ये दहा रुपये किमतीची नूडल्सची दोन पाकिटे खरेदी करून वार्ताहराने मॅगीमध्ये आणखी किती प्रकार मिळतात, अशी चौकशी केली. त्यावर दुकानदार म्हणाला, ‘‘हे घ्या. खा के पियो, या पी के खाओ ही जाहिरात लागते ना; त्याचं हे सुपी नुडल्सचं पाकीट. पंचवीस रुपयांना आहे. पण जास्त तिखट नाही, मुलांना खूप आवडेल, घेऊन जा बिनधास्त.’’ इतके बोलल्यावर सुपी नुडल्सचेही एक पाकीट खरेदी केले. बंदी असूनही मॅगीची सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास येऊन प्रशासनाचा दुकानदारांवर धाकच नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरूच आहे. नागरिकांमध्येही अनेकजण अनारोग्याच्या गर्तेत जाण्याचा धोका आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून विक्रीवर आळा आणावा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.चव चांगलीतपोवन मंदिरापासून जवळच असलेल्या एका दुकानात चौकशी केली. त्या वेळी सुरुवातीला दुकानदाराने थेट किती पाकिटे पाहिजेत, अशी विचारणा केली. तेव्हा मॅगी पास्ता आहे का याबाबत छेडले असता तो म्हणाला, ‘‘पास्ता दुसऱ्या कंपनीचा आहे. त्यापेक्षा मॅगीचे टोमॅटो फ्लेवरचे गोड नुडल्स घ्या. चव चांगली आहे.’’ बोलतानाच दुकानदाराने मॅगीच्या अनेक प्रकारांची पाकिटे पुढे ठेवली. दरम्यान, या पाकिटांची पाहणी केली असता, ती मे महिन्यातच उत्पादित केली असल्याची तारीख त्यावर असल्याचे निदर्शनास आली.पोरांसाठी मॅगी घेतोच...भाटनगर परिसरातील एका टपरीवजा दुकानात पाहणी केली. त्या वेळी काही महिला, तसेच पुरुषही दुकानातून मॅगीची खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यांना बातमीदाराने यावर बंदी आल्याचे माहिती आहे का तुम्हाला, असे विचारले. त्यावर, ‘माहिती आहे की, पण आम्ही आठवडा बाजार भरल्यावर पोरांसाठी मॅगीची पाकिटं घेतोच. आता शाळा सुरू होणार. घाईच्या वेळी नाष्टा म्हणून, नाहीतर संध्याकाळी पोरांनी मागितल्यास मॅगी करून देतो. त्याला काय होतंय!’ असे म्हणत ग्राहकांनी आपली वाट धरली. माल पडून ठेवायचा का?काळेवाडीतील काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. अहो, आता बंदी केली. काही दिवसांनी ती उठणार, मग आम्ही दुकानात भरलेला हा माल काय पडून ठेवणार का? सगळ्याच नूडल्स, पास्ता, सूपची टेस्ट करायला पाहिजे अशी पुस्ती त्यांनी जोडली. महागडी पाकिटे घेण्याचा आग्रहपिंपळे सौदागर येथे मागील आठवड्यातच विक्री होत असलेल्या २ दुकानांमध्ये चौकशी केली. त्यामध्ये मंगळवारी मॅगीची पाकिटे मिळत नसल्याचे दिसून आले. गोविंद यशदा चौकाजवळ काही दुकानांत पाहणी केली असता आम्ही मॅगीचा माल माघारी पाठविला असल्याचे दुकानदारांनी स्पष्ट केले. त्याऐवजी देशी कंपन्यांच्या उत्पादनांचा पर्याय सुचवित वेगवेगळ्या प्रकारची देशी नूडल्सची ५, १०, २५, ५० रुपये किमतीची, तसेच थोडी महागडी पास्ताची पाकिटे घेण्याचा आग्रह त्यांनी केला.
मॅगीवर बंदी? छे, अद्याप विक्रीच!
By admin | Published: June 10, 2015 5:14 AM