पुणे : आर्थिक घोटळ्याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे यांच्यासह बँकेच्या अधिकाºयांना केलेली अटक म्हणजे पोलिसांनी आपल्या अधिकाराचे उल्लंघन केलेले आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि आॅफिसर्स असोसिएशनने केली आहे.आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बॅँक आॅफ महाराष्टÑचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे यांच्यासह बँक आॅफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनहोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) या अधिकाºयांना बुधवारी अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी) आणि इतर फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार आणि अधिकारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.बँक आॅफ महाराष्ट्र ही भारत सरकारची बँक असून, मराठे यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे. बँकेचे स्वत:चे संचालक मंडळ असून, त्यावर रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय) आणि सरकार नियुक्त संचालक आहेत.त्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करण्याचा अधिकारच नाही, असे पत्रात नमूद केले आहे. आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर आणि बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स असोसिएशनचे महासचिव राजीव ताम्हाणे यांनी हे पत्र पाठविले आहे.दरम्यान, डीएसके यांच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत़
महाबँक अधिकाऱ्यांच्या अटकेत पोलिसांकडून अधिकारांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 5:52 AM