बारामती (जि. पुणे) : दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब दोडतले यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपींनी हा व्हिडिओ प्रसारित करून समाजात बदनामी करून राजकीय भविष्य धोक्यात आणण्याची धमकी या पाच जणांनी दिली होती. सचिन पडळकर, दत्ता करे (दोघेही रा. माळशिरस), तात्या कारंडे, विकास आलदर (दोघेही रा. माढा) आणि डॉ. इंद्रकुमार भिसे (रा. शिरूर),अशी आरोपींची नावे आहेत. महादेव जानकर व अण्णासाहेब दोडतले यांना संशयित आरोपींनी सोशल मीडियावर क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी ४ मे रोजी बारामती येथील हॉटेलमध्ये फिर्यादी व आरोपी यांनी तडजोडीसाठी बैठक घेतली होती. तडजोडी करून ३० कोटी खंडणी देण्याचे ठरले. खंडणीचा १५ कोटींचा पहिला हप्ता गुरुवारी देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार पोलीसांत देण्यात आली होती. बारामती गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून आरोपींची चौकशी सुरू होती.
महादेव जानकर यांच्याकडे ५० कोटींची खंडणी मागितली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:25 AM