पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याबरोबर आमची बोलणी सुरू आहेत. मी स्वत: त्यांच्याशी बोललो आहे. ते आमच्याबरोबर येतील असा विश्वास आहे, असे परिवर्तन महाशक्तीचे संयोजक तथा स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. त्यांच्याबरोबरच अन्य काहींचेही महाशक्तीत प्रवेश होतील, असा दावा त्यांनी केला.
स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार अपंग क्रांतिकारी संघटनेचे बच्चू कडू व स्वराज्य पक्ष अशी परिवर्तन महाशक्ती विधानसभा निवडणुकीसाठी आकार घेत आहे. हे तीनही नेते व अन्य काही संघटनांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी पुण्यात झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी महादेव जानकर यांच्या संदर्भातील ही माहिती दिली. येत्या काळात परिवर्तन महाशक्तीमध्ये राज्यातील काही महत्त्वाचे नेते प्रवेश घेतील, असेही त्यांनी सूचित केले. याचा अर्थ तिकडे उमेदवारी नाही, म्हणून आमच्याकडे मिळेल, असे नाही. आम्ही माणूस तपासूनच त्याच्याबाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
महादेव जानकर महायुतीसमवेत होते. मात्र त्यांनी आता महायुतीत जाणार नाही, असे जाहीर केले आहे. आपल्या पक्षासह आपण स्वतंत्र लढणार, असे ते सांगतात. त्यांच्यासंदर्भात विचारल्यानंतर संभाजीराजे यांनी जानकर यांच्याबरोबर बोलणी सुरू असल्याचे सांगितले. राजू शेट्टी व बच्चू कडू यांनी त्याला दुजाेरा दिला. परिवर्तन महाशक्ती ही फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार मानणारी शक्ती आहे. आम्हाला गरीब, उपेक्षित, वंचित, कष्टकऱ्यांसाठी काम करायचे आहे. या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणालाही परिवर्तन महाशक्तीचे दरवाजे खुले आहेत, असे संभाजीराजे यांनी सांगितले.