लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत दाखल झाले.परभणीचे मतदान शुक्रवारी (दि २६) संपले.त्यानंतर जानकर हे पुढील राजकीय व्युहरचनेसाठी या मतदारसंघात दाखल झाले आहेत.
जानकर हे शनिवारी (दि २७) सकाळी शिखर शिंगणापुर येथे महादेवाच्या दर्शनाला पाेहचले.त्यानंतर ते इंदापुर तालुक्यातील निमगांव केतकी येथील एका कार्यकर्त्याच्या शेतात जानकर यांनी बैठक घेतली.या ठीकाणी असणार्या शेततळ्यात जून्या सवंगड्यांसमवेत पोहण्याचा आनंद लुटला.त्यानंतर दुपारी जानकर हे सोमेश्वरनगरला पोहचले.येथील सोमेश्वराचे दर्शन घेतले.त्यानंतर बारामती शहरात प्रमुख कार्यकर्ते यांची ‘रासप’ कार्यालयाज बैठक घेतली.त्यानंतर जानकर हे बीडला पंकजा मुंडे यांच्या सभेसाठी रवाना झाले.दरम्यान दोन दिवसांनंतर जानकर हे बारामती,इंदापुर,दाैंड,भाेर या ठीकाणी सभा घेणार आहेत,अशी माहिती ‘रासप’ जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलतना दिली.
दरम्यान,जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपण परभणीतून विजयी होवु असा विश्वास व्यक्त केला.परभणीमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी मोठी मदत केली.माझ्या विजयात या तिघा नेत्यांचा मोठा वाटा असेल,असे जानकर म्हणाले.त्यामुळे माझ्यावर प्रेम करणार्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी सुनेत्रा पवार यांना मतदान करावे,असे आवाहन जानकर यांनी यावेळी केले.२०१४ च्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांची चांगलीच दमछाक केली होती. त्यावेळी सुळे यांना ५ लाख २१ हजार, तर जानकर यांना ४ लाख ५१ हजार मतदान मिळाले होते. सुळे यांचा अवघ्या ६९ हजार ६६६ मताधिक्क्य मिळाले होते. आता तेच जानकर महायुतीच्या बाजुने आहेत. जानकर आणि ‘रासप’च्या विचारांचा आजही या भागात मोठा प्रभाव आहे.हा प्रभाव महायुतीला कितपत उपयुक्त ठरणार,हे पाहण्यासाठी मात्र लोकसभा निकालाची वाट पहावी लागणार आहे.