पुणे : पुणे शहरात काही तासात दाखल होणारी भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर अक्षरशः इंचाइंचावर स्वागताचे फ्लेक्स बघायला मिळत आहेत. त्यातच फ्लेक्स लावण्यावरून कोथरूडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाल्यावर आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ही यात्रा पुण्यात येणार आहे.हडपसरपासून सुरुवात करून शहरातला विविध भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. फडणवीस यांची यात्रा शहराचा मोठा क्षेत्रातून जाणार असून त्यानिमित्ताने अनेक इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. बहुतेक त्यात नळस्टॉप चौक आणि काही भागात क्रेनच्या साहाय्याने मुख्यमंत्र्यांना विशाल पुष्पहार घातला जाणार आहे.
शहरातील सर्व रस्त्यावर नगरसेवक आणि विद्यमान आमदार यांनी प्रचंड फ्लेक्स लावले आहेत. त्यात कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचाही समावेश आहे. त्यांनी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी म्हात्रे पुलापासून ते नळस्टॉप चौकापर्यंत प्रत्येक टप्प्यावर फ्लेक्स लावले आहेत. त्याच भागातील मेहंदळे गॅरेज चौकात फ्लेक्स लावण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये आपापसात हाणामारी झाली आणि त्यात काही जण जखमीही झाल्याचे वृत्त आहे. अर्थात दोन्हीही बाजूच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल न करणेच पसंत केल्याचे समजते.
सध्या कोथरुडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरु असून त्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे बघायला मिळाले.