पुणे : महाज्याेती, सारथी आणि बार्टी संस्थेच्या तर्फे पीएचडी फेलाेशिपसाठी राज्यात सीईटी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, या सीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका ही २०१९ मधील सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची काॅपी असल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा एमएच- सेट परीक्षा विभाग येथे सीईटीचा प्रश्नपत्रिका सेट करण्यात आली हाेती. त्यामुळे सेट परीक्षा विभागाचा दर्जा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीईटी परीक्षेत घडलेल्या प्रकारामुळे सेट विभागही सीईटीची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी गंभिर नसल्याचे दिसून आले. सीईटी परीक्षेत झालेला प्रकार पाहता राज्यसरकारने परीक्षांवर पैसा खर्च करण्यापेक्षा विविध संस्थांकडे पीएच.डीसाठी नाेंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संशाेधनासाठी सरसकट फेलाेशप द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून हाेत आहे. राज्यशासनाने तातडीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे आदेश दिला हाेता. त्यामुळे आम्हाला पुरेसा वेळ न मिळाल्याने गाेंधळ झाल्याचे माेघम स्पष्टीकरण सेट विभागाकडून दिले जात आहे. फेलाेशिपसाठी गुणवंत विद्यार्थी निवडले जावेत त्यादृष्टीने प्रश्नपत्रिका सेट करणे गरजेचे हाेते. मात्र, प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी काेणतीही तज्ज्ञ समिती गठीत केली नसल्याचे उघडकीस येत आहे.
प्रश्नपत्रिका सेटींगसाठी वेळ मिळाला नाही
सेट परीक्षा विभागाकडून यापूर्वी असा प्रकार घडलेला नाही. आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ दिला गेला नाही. सेट आणि सीईटी प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेल्या सूचना वेगवेगळ्या आहेत. परीक्षेतील काही प्रश्न पुन्हा येण्याची शक्यता असते. मात्र, पूर्ण प्रश्नपत्रिका जशाला तशी सारखी येत नाही. परीक्षांसाठी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांना पासवर्ड सुरक्षा दिलेली असते. त्यापैकी काेणतेही एक प्रश्नपत्रिका रॅन्डमली निवडून प्रिटींगला पाठविली जाते. त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक २०१९ ची प्रश्नपत्रिका दिली असे नाही तसेच पेपर फुटलेला नाही. - प्रा. बाळासाहेब कापडणीस, समन्वयक एमएच-सेट विभाग
फेलाेशिपसाठी घेतलेली सीईटी परीक्षा रद्द करावी. तसेच घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चाैकशी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. राज्यशासनाने सर्व संस्थांकडे नाेंदणी केलेल्या तसेच आंदाेलन करणाऱ्या संशाेधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलाेशिप जाहीर करीत न्याय द्यावा. - नितीन आंधळे, संशाेधक विद्यार्थी