लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महामेट्रो कंपनी मेट्रो स्थानकाच्या १ किलोमीटर परिघात प्रवाशांना नेण्या-आणण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यासाठी काही सार्वजनिक प्रवासी वाहन संस्थासोबत महामेट्रो करार करण्याच्या प्रयत्नात आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे अशा दोन्ही शहरांसाठी ही सुविधा असणार आहे. या दोन्ही शहरांमधील पिंपरी- चिंचवड ते दापोडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गांचे काम सुरू आहे. यातील पिंपरी- चिंचवड ते दापोडी या मार्गावर तर मेट्रोची चाचणीही घेण्यात आली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गाचे कामही गतीने सुरू आहे. हे मार्ग जास्तीत जास्त लवकर सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.
या दोन्ही मार्गांवरील स्थानकाच्या १ किलोमीटर परिघातील प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. त्यासाठी महामेट्रोने काही संघटनांबरोबर संपर्क साधला असल्याची माहिती मिळाली. वाहने आकाराने लहान असावीत, शक्यतो विद्युत शक्तीवरची असावीत, सतत फेऱ्या मारण्याची त्यांची क्षमता असावी, अशा महामेट्रोच्या काही अटी आहेत. प्रवाशांना स्थानकापर्यंत येणे व स्थानकात उतरल्यानंतर इच्छित स्थळापर्यंत लवकर पोहचता यावे, यासाठी ही सुविधा आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या सुरुवातीच्या काळात प्रवाशांना आकर्षित करण्याचाही उद्देश त्यामागे आहे.
--//
चर्चा सुरू आहे
मेट्रो असलेल्या प्रत्येक शहरात अशी फर्स्ट माईल, लास्ट माईल सुविधा असते. त्यामुळे स्थानकाजवळ गर्दी होत नाही, प्रदूषण कमी होते, प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत येणे-जाणे सुलभ होते. काही वाहन संस्थांबरोबर चर्चा सुरू आहे.
- मनोजकुमार, वरिष्ठ अधिकारी, महामेट्रो