लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहातो. मग ज्यांनी अशा महासंकटांपैकी एखाद्या जरी संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल? अशाच एका महासंकटात पुणे शहर १२ जुलै १९६१ या दिवशी सापडले होते. पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात हाहाकार उडाला तो सांगायला अनेकांचे शब्दच अपुरे पडतात. सोमवारी (दि. १२) या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत... तो दिवस आजही विसरू शकत नाही....अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागविल्या.
मी त्या वेळी दुसरीत होतो. नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ पाटणकरांच्या वाड्यात आम्ही राहात होतो. रस्त्यालगत आमचं घर होतं. सध्याच्या कोतवालवाडा (पूर्वी जिथं विष्णुशास्त्री चिपळूणकर राहत असत) त्यांच्यासमोर आमचा वाडा. तो दिवस उजाडला नेहमीसारखाच. पण नियतीनं दुसरंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. त्या दिवशी आमच्या घरी मी आई, माझी दोन भावंडं होती. तसेच आत्या, काका वगैरे पाहुणे आले होते. वडील नोकरीनिमित्त मुंबईला होते. सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पानशेत धरण फुटले व धरणातून पाणी वाढू लागलं. अशा बातम्या येऊ लागल्या. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितलं. नंतर पाणी वाढू लागलं अशा बातम्या यायला लागल्या. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितले. नंतर पाणी वेगानं लकडी पुलावरून वाहू लागलं व म्हणता म्हणता नारायण पेठेपर्यंत आलं. जनसमुदाय आम्हाला घराबाहेर जा असं सांगत होता. आई स्वयंपाक करीत होती. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. परंतु काकाच्या मदतीने आम्ही सर्व जोगेश्वरी मंदिराजवळ राहणाऱ्या आजीकडे गेलो आणि सुखरूप राहिलो. दुसऱ्या दिवशी घरी येऊन पाहतो तर घरात पाणी आल्याचं दिसलं. आई करीत असलेल्या पोळ्या चिखलात रुतून बसल्या होत्या. सगळीकडे चिखल झाला होता. वह्या, पुस्तकं, धान्य, भांडीकुंडी सर्वच खराब झालं होतं. मुंबईच्या पेपरामधील बातमी वाचून वडील पुण्याला आले. पुराची आठवण आजही ताजी आहे. त्याची आठवण आल्यानंतर अंगावर शहारे येतात... अशी आठवण माधव ताटके यांनी सांगितली.
-----------------------------
मी त्या वेळी आठवीत होतो. शाळेत असतानाच आम्हाला पूर आल्याचे सांगण्यात आले आणि शाळा सोडून देण्यात आली. माती गणपतीजवळ घर असल्याने तिथे गेल्यावर गुडघाभर पाणी झाले होते. चुलत्यांनी मला पाहिल्यानंतर मावशीकडे पाठविले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मावशीने आम्हा सर्वांना उठवले आणि पर्वतीवर पाठवले. पुन्हा धरण फुटले आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पाणी येणार अशी अफवा पसरली. त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत, अशा स्मृती प्रा. प्र. के. घाणेकर यांनी जागविल्या.
-----------------------------