नारायणगाव ; आज एकादशी आहे , आणि आज मी माझ्या पांडुरंगाला भेटायला चाललो आहे , अर्थात माझे पांडुरंग हे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत , मी त्यांच्यासोबतच राहील . तथापि, अजित पवार यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा , आजमितीला पक्षामध्ये फूट पडणे हे पक्षाच्या हिताचे नाही . विधानसभा निवडणुकीत प्रतिकुल परिस्थिती असताना सर्वांनी एकत्रित येऊन जो लढा दिला आणि त्या लढ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे . त्यामुळे शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी दिली . दरम्यान , काँग्रेस ( आय ) पक्षातुन शरद पवार हे बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली , त्यावेळी आ. अतुल बेनके यांचे वडील व तत्कालीन आमदार वल्लभ बेनके हे त्यावेळी शरद पवार यांच्या बरोबर राहिले होते . शरद पवार यांचे कट्टर व विश्वासू समर्थक म्हणून वल्लभ बेनके यांचेकडे पाहिले जात होते , 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेले अतुल बेनके हे देखील शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहणार हे त्याचे वक्तव्यातुन स्पष्ट झाले आहे .
वळसे पाटील शरद पवारांसोबत ... राष्टवादी काँग्रेस राज्यातील प्रमुख नेते व आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील हे राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत आहेत. अजित पवार यांचा शपथविधी झाल्या पासून शरद पवार यांच्या प्रत्येक बैठकीला व सोबत वळसे पाटील हजर आहेत. वळसे पाटीलांच्या राजकारणाची सुरवात शरद पवार यांच्यापासून झाली व तेव्हा पासून ते शरद पवारांशी एकनिष्ट आहेत. शरद पवार यांची साथ कधीच सोडू शकणार नाही, असे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे व त्याची प्रचीती देखील आज आली. अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आली सकाळ पासून वळसे पाटील शरद पवार यांच्या सोबत आहेत. या धावपळीत वळसे पाटील यांच्याशी संपर्क झाला नसला तरी तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, शरद पवार यांची साथ सोडण्याचा विचार सुध्दा आमच्या मनात येणार नाही, असे ठाम पणे सांगत होते.