पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारवी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. यात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी ९४.१५ ऐवढी आहे. त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागला आहे. तर पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. पुणे विभागात २० हजार १५१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर गैरमार्गाने परीक्षा दिल्याने तीन विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. वंदना वाहूळ आणि विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी दिली.पुणे विभागात एकूण २ लाख ४९ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २९ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाची निकालाची एकूण टक्केवारी ९२.६१ आहे. त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५९, तर मुलांचे ९१.०४ इतके आहे. तर पुनपरीक्षार्थी अर्थात रीपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल ४७.९१ टक्के लागला आहे.
सोलापूर जिल्ह्याचा निकाल : (९४.१५ टक्के)सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ५१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९४.१५ टक्के इतकी आहे. सोलापुरात अनुत्तीर्णाची संख्या ३ हजार ४९७ इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७५, तर मुलींचे ९६.११ टक्के इतकी आहे.अहमदनगर जिल्ह्याचा निकाल : (९१.४६ टक्के)अहमदनगर जिल्ह्यातील ६४ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार २३४ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ६० हजार १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर निकालाची टक्केवारी ९३.६० टक्के इतकी आहे. नगर जिल्ह्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७७७ इतकी आहे. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९६.४१, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५८ टक्के इतकी आहे.
पुणे जिल्ह्याचा निकाल : (९१.४६ टक्के)पुणे जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १०३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २९ हजार २५७ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून १ लाख १८ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९१.४६ टक्के इतकी आहे. म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ११ हजार ८७७ एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.९८ टक्के तर मुलींचे ९३.१९ टक्के आहे.