पुणे : देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रजासत्ताकदिनी (दि. २६) १८९ कैद्यांना माफी देऊन त्यांची कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने आदेश दिले असून, त्यानुसार कारागृहातून कैद्यांची सुटका करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार मागील १५ ऑगस्ट रोजी राज्यातील २०४ कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. येत्या २६ जानेवारीला १८९ कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यापुढेही स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी काही कैद्यांची सुटका करण्याचे प्रस्तावित आहे.
दरम्यान, गंभीर गुन्ह्यात दोषी असलेल्या कैद्यांची कारागृहातून सुटका केली जाणार नाही. केवळ शिस्त आणि चांगली वर्तणूक असलेल्यांनाच कारागृहातून सोडण्यात येणार आहे. त्यांनी देशाचे जबाबदार नागरिक होण्यासाठी त्यांना ही संधी देण्यात आली आहे. तसेच कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.