पुणे : मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून राज्यात २९ सप्टेंबरनंतर चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, जून ते २६ सप्टेंबरपर्यंत राज्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ ७१ टक्के उपयुक्त जलसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे शेतीच्या सिंतनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
राज्यात १ जून ते २६ सप्टेंबर या काळामध्ये ९८० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होत असतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ८७५ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या तो ८९.३० टक्के इतका आहे. या पावसामुळे राज्यातील मोठे, मध्यम व लघ अशा २ हजार ९९४ प्रकल्पांमध्ये मिळून २८ हजार ६७३ दशलक्ष घन मीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरीच्या हा साठा ७०.८३ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ८९.३३ टक्के इतका होता. राज्यात सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात २५२५.४६ दलघमी अर्थात ३५.०६ टक्के इतका आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. परतीच्या पावसाचा या विभागाला फारसा फायदा होत नसल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे कोकण विभागात ९४ टक्के जलसाठा असून त्यानंतर नागपूर विभागात ८५.५५ टक्के, अमरावती विभागात ७८, पुणे विभागात ७५, नाशिक विभागात ७३ टक्के पाणीसाठा आहे.
पाचशे टँकर सुरू-
राज्यात गेल्या वर्षी याच महिन्यात एकही पाण्याचा टँकर सुरू होत नव्हता. मात्र यंदा पाऊसच कमी झाल्याने राज्यातील ४४७ गावांमध्ये पाण्याचे ४९४ टँकर सुरू झाले आहेत. यावरूनच उन्हाळ्यात दुष्काळाची स्थिती कशी असेल याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
विभाग उपयुक्त जलसाठा (दलघमी) यंदाची टक्केवारी गेल्या वर्षीचा साठा (टक्क्यांत)
नागपूर ३९४०.९५--८५.५५--८८.१४
अमरावती २९४६.३७--७८.०५--९२.५३संभाजीनगर ४३०८.१८--३५.०६--८५.२०
नाशिक ५१४७.४४--७३.२०--८५.६३पुणे १४५२६.८६--७५.०५--९२.००
कोकण ३६५४.७५--९४.११--९०.६२एकूण ३६२७९.२४--७०.८३--८९.३३