पुणे : देशात सर्वप्रथम ‘जेएन. १’ या ओमिक्राॅनच्या (काेराेना) व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षांच्या पुरुषालाही या व्हेरिएंटची लागण झाली आहे. या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत. तसेच याची साैम्य लक्षणे असून, ताे बरा हाेताे, असेही आराेग्य विभागाने म्हटले आहे.
केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षांच्या महिलेला या ‘जेएन.१’ विषाणूची लागण झाली हाेती. आता ती महिला पूर्णपणे बरी झाली आहे. ‘जेएन.१’ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असे आराेग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यामध्ये नियमितपणे काेराेनाबाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनाेम सिक्वेन्सिंग) करण्यात येत आहे. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.
या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या इन्फलुएंझा लाईक इलनेस व सारी रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत. राज्यामध्ये सद्य:स्थितीमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता आहे, अशी माहिती राज्याचे सहसंचालक डाॅ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे.
भारत सरकारच्या सूचनेनुसार, कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील १२६४ सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील दिनांक १५ ते १७ डिसेंबरला करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हे, महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या महत्त्वपूर्ण मॉकड्रिलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू, सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडिसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला आहे, अशी माहिती आराेग्य खात्याने दिली आहे.
आढावा घेण्यात आलेली रुग्णालये
रुग्णालयांचा प्रकार - संख्या
सरकारी रुग्णालय : ६५५
खासगी रुग्णालये : ५७५
खासगी वैद्यकीय महाविद्यालये : १४
सरकारी वैद्यकीय महाविद्यालये : १४
अन्य रुग्णालये : ६
एकूण : १२६४
उपलब्ध सुविधा आणि साहित्य
आयसोलेशन बेड : ६३,६७५
ऑक्सिजन बेड : ३३,४०४
आयसीसू बेड : ९,५२१
व्हेंटिलेटर बेड : ६,००३
एकूण उपलब्ध डॉक्टर : २३,७०१
काेरोना संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर : २२,३३०
उपलब्ध परिचारिका : २५,५९७
प्रशिक्षित परिचारिका : २२,३२४
आरोग्य कर्मचारी : १०,२३६
प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी : ९,१०१
आयुर्वेदिक डॉक्टर : ८,२५८
प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टर : ७९९
‘जेएन.१’ या कोविडच्या नव्या विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. याबाबत काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. याशिवाय कोविड संबंधित नियमावलीचे पालन करा.
- तानाजी सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य