Maharashtra Assembly Election 2024 : बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिवाळीनिमित्त येथील गोविंदबागेतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतात. गेल्या पन्नास वर्षांपासून हा पायंडा सुरू आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्यभरातून बडे राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी येतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आता सत्ताकेंद्र विभागले आहे. त्यामुळे दिवाळी- पाडवा शरद पवार हे गोविंदबागेत, तर अजित पवार काटेवाडीतील निवासस्थानी साजरा करणार आहेत.
शनिवारी दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबाग येथे शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार आणि सर्व पवार कुटुंबीय हितचिंतकांना भेटणार आहेत. काटेवाडीतील निवासस्थानी अजित पवार पहिल्यांदाच भेटीगाठी घेणार आहेत. सकाळी साडेसहा वाजेपासूनच ते सर्वांना भेटणार आहेत. सुनील तटकरे व काहींचे फोन आले होते, त्यामुळे काटेवाडीत मी कार्यकर्त्यांना भेटण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
...शारदोत्सवाला अजित पवार यांची अनुपस्थितीगतवर्षी २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी गोविंदबागेत दिवाळी साजरी केली. आजारपणामुळे दिवाळी-पाडव्याला उपस्थित राहणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवले होते. मात्र, रात्री गोविंदबागेत पत्नी सुनेत्रा पवार पार्थ व जय या दोन मुलांसोबत उपस्थित होत्या.दिवाळीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दरवर्षीप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित शारदोत्सव कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित होते.
भाऊबिजेकडे लक्ष : गतवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भाऊबीज काटेवाडीत उत्साहात साजरी झाली होती. यंदा या भावंडांची भाऊबीज साजरी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.