पुणे: मनूच्या आधारावर राज्य घटना तयार करावी असे म्हणणारे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची आठवण काढतात. ते तर घरावर तिरंगाही लावत नव्हते अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरूवारी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. नेताजी बोस, सरदार पटेल यांची आज नावे घेता, पण स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही कुठे होता असा खडा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी पुण्यात आले होते. जाहीर सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद त्यांच्यासमवेत होते. "मी ५३ वर्षे राजकारणात आहे. अनेक निवडणूका पाहिल्या, पण राज्यांच्या निवडणूकीत पंतप्रधान, ग्रुहमंत्री प्रत्येक मतदारसंघात फिरताना कधीही पाहिले नाही. ते येतात आणि गांधी कुटुंबाला शिव्या घालतात. महाराष्ट्रात राहुल गांधी मुख्यमंत्री होणार आहेत का? पण ते त्यांच्यावरच टीका करतात. कारण तोच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे," असं खरगे यांनी म्हटलं.
"तुम्ही देशात, महाराष्ट्रात काय करणार आहात ते सांगा, पण ते तसे काहीही बोलत नाहीत अशी टीका करून खर्गे म्हणाले, "तूम्ही भ्रष्टाचारी आहात असे सांगून त्यांनी काहीजणांना धमकावले व नंतर त्यांनाच बरोबर घेतले. देशात महागाई वाढली, अन्नधान्य महाग झाले, बेरोजगारी वाढली. त्यावर बोलले तर ठीक आहे, पण ते इथले प्रोजेक्ट तिकडे घेऊन चालले आहेत. सत्ता बदलण्यासाठी ते काहीही करतात. महाराष्ट्र मणीपूर गोवा अशी कितीतरी ऊदाहरणे आहेत. खोके आणि सबकुछ ओके अशी त्यांची पद्धत आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या सर्व घोषणांची अमलबजावणी काँग्रेसच्या सरकारांनी सत्तेवर आल्यानंतर केली. आम्ही बजेट पाहूनच घोषणा करतो व त्या अमलातही आणतो. आमच्याकडे डोके आहे, तुमच्याकडे खोके आहे," असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
बटेंगे तो कटेंगे या घोषणेचाही खरगे यांनी समाचार घेतला. देश एकच आहे व तो एकच ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. देशासाठी प्राण देण्यास काँग्रेस नेहमीच तयार असते असेही खरगे यांनी म्हटलं.