इतक्या खालचे राजकारण नको!, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:22 AM2024-10-29T08:22:14+5:302024-10-29T08:23:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : बारामती तहसील कार्यालयात सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये”, अशा शब्दांत अजित पवार यांनी चुलता-पुतण्या लढतीवर भाष्य केले.
Maharashtra Assembly Election 2024 : काटेवाडी (बारामती) : आई सांगतेय, माझ्या दादाच्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका. या पद्धतीने जे चाललंय ते बरोबर नाही. मग, याबाबत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने यामध्ये सांगायला पाहिजे होते. त्यांना फाॅर्म भरायला कोणी सांगितला होता, ‘साहेबां’नी सांगितले, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले, असे म्हणायचे का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला; यावेळी अजित पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. भावनिक झालेल्या पवार यांनी काही वेळ थांबत आवंढा गिळला.
बारामती तहसील कार्यालयात सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये”, अशा शब्दांत अजित पवार यांनी चुलता-पुतण्या लढतीवर भाष्य केले.
ती चूक मी कबूल केली...
सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. ती माझी चूकच होती, मी मनाचा मोठेपणा दाखवत चूक कबूल केली. मग, आता चूक कोणी केली?
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, हे लक्षात ठेवा, अशी सादही अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली.
आईने असे काही सांगितले नाही : श्रीनिवास पवार
आईने असे काही सांगितले नाही, ‘राजकारण’ या विषयावर आई बोलत नाही, असे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी चूक मान्य केली असली, तरीदेखील आता माघार नाही. योगेंद्र पवार यांची उमेदवारी कायम आहे. अजित पवार यांनी घातलेला घाव विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.