Ambegaon Assembly Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आंबेगावमध्ये उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांचे जुने सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. भाषणादरम्यान, शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना गद्दार म्हटलं. शरद पवार यांनी केलेल्या टीकेला दिलीप वळसे पाटील यांनी अद्याप प्रत्युत्तर दिलेलं नाही. मात्र त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या टीकेवर भाष्य केलं आहे.
आंबेगाव येथे देवदत्त निकम यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचा गद्दार असा उल्लेख केला. शरद पवारांनी आपल्या जाहीर सभेत गद्दारांना सुट्टी नाही. वळसे पाटील यांनी गद्दारी केली त्यांना पराभूत करा, असे आवाहन केले होते. शरद पवारांच्या या वक्तव्याविषयी दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. १८ नोव्हेंबरच्या सांगता सभेत दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना प्रत्युत्तर देणार आहेत. मात्र त्याआधी पूर्वा वळसे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसेंनी जनतेचं पाणी वाचवून गद्दारी केली असेल तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही, असं पूर्वा वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
"आपल्या हक्काचं पाणी, आमच्या मतदारसंघाचं पाणी, आमच्या तालुक्याचं पाणी, सात लाख जनतेचं पाणी जे पळवून नेतात त्यांच्याशी आपल्या साहेबांनी गद्दारी केली. सात लाख लोकांचा लढा आपले साहेब लढत आहेत त्याचं काय? या गोष्टीचं खंडण झालं का त्या सभेत, आले का समोर व्हिडीओ. हा बोगदा होणार म्हणजे होणारच. सहा महिने पाणी आलं नाही तर काय होईल. एक खराब उन्हाळा आला, एक दिवस पाणी आलं नाही तर जिवाची तळमळ होते, सहा महिने पाणी आलं नाही तर आपण रस्त्यावर येऊ, आपल्या तोंडातील घास काढून दुसऱ्यांच्या तालुक्यात नेत हे लोक दिवाळी करायला निघालेत, काही तर लाज वाटली पाहिजे," असं पूर्वा वळसे पाटील यांनी म्हटलं.
"दातृत्त्व भाव आपल्यात नाहीये का? २०१८ मध्ये साहेबांनी म्हटलं होतं धरणातील जे अतिरिक्त पाणी आहे ते बोगद्यानं हमखास न्या. ११ मीटरच्या पातळीवर बोगदा करा आणि हमखास न्या. पण त्यांना तळामध्ये १ मीटर पातळीवर बोगदा करुन पाणी त्यांच्या तालुक्यात न्यायचंय, समोरच्या पक्षातील ज्येष्ठ असतील किंवा इतर कोणी असतील कोणी याचं खंडण करत नाहीत. म्हणजे आपली किती जमेची बाजू आहे समजून घ्या. दिलीप वळसेंनी जनतेचं पाणी वाचवून गद्दारी केली असेल तर लाज वाटण्यासारखं काहीचं नाही. काल दूध का दूध, पाणी का पाणी झालं, एका अर्थानं देवाचे आभार मानते, काल घडलं ते खूप चांगलं झालं," असंही पूर्वा वळसे पाटील यांनी म्हटलं.