maharashtra assembly election 2024 result: पुण्यात २१ पैकी १८ जागांवर महायुती; २ ठिकाणी आघाडीचे गढी अन् १ अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:05 PM2024-11-24T12:05:58+5:302024-11-24T12:06:18+5:30

maharashtra assembly election 2024 result शहरात ८ पैकी महायुतीला ७ व १ जागा शरद पवार गटाला, तर जिल्ह्यात १० पैकी ६ जागा अजित पवार गटाला व भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना व अपक्षाला प्रत्येकी १ जागा

maharashtra assembly election 2024 result mahayuti in 18 out of 21 seats in Pune 2 leading strongholds and 1 independent | maharashtra assembly election 2024 result: पुण्यात २१ पैकी १८ जागांवर महायुती; २ ठिकाणी आघाडीचे गढी अन् १ अपक्ष

maharashtra assembly election 2024 result: पुण्यात २१ पैकी १८ जागांवर महायुती; २ ठिकाणी आघाडीचे गढी अन् १ अपक्ष

पुणे : जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत शनिवारी (दि. २३) झालेल्या मतमोजणीत महायुतीला १८, महाविकास आघाडीला केवळ दोन जागा, तर एक जागा अपक्षाला मिळाली. महायुतीत भाजपला ९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ८, शिंदेसेनेला एक जागा मिळाली. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. शहरात ८ पैकी महायुतीला ७ व एक जागा शरद पवार गटाला, तर जिल्ह्यात १० जागांपैकी सर्वाधिक ६ जागा अजित पवार गटाला व भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना व अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली. पिंपरी शहरात २ जागा भाजप व १ जागा अजित पवार गटाला मिळाली, तर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १२ हजार ४१चे मताधिक्य कोथरूड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना मिळाले. सर्वात कमी १ हजार ५२३ मतांनी आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिलीप वळसे-पाटील निवडून आले. या निवडणुकीत २० विद्यमान आमदार आपले नशीब अजमावत होते. मात्र, त्यातील ६ आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. (maharashtra assembly election 2024 result)


जिल्ह्यात २१ मतदारसंघांसाठी शनिवारी (दि. २३) मतमोजणी झाली. त्यानुसार शहरात शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा ३६ हजार ७०२ मतांनी पराभव केला. शिरोळे यांना ८४ हजार ६९५, तर बहिरट यांना ४७ हजार ९९३ मते मिळाली. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांच्यावर १० हजार ३२० मतांनी विजय मिळवला. कांबळे यांना ७६ हजार ३२, तर बागवे यांना ६५ हजार ७१२ मते मिळाली. खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर ५२ हजार ३२२ मतांनी विजयी झाले. त्यांना १ लाख ६३ हजार १३१, तर त्यांचे प्रतिस्पर्धींना १ लाख १० हजार ८०९ मते मिळाली. कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासने यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. रासने यांनी धंगेकर यांच्यावर १९ हजार ४२३ मतांनी मात केली. रासने यांना ९० हजार ४६, तर धंगेकर यांना ७० हजार ६२३ मते मिळाली.

कोथरूड मतदारसंघात ‘भाजप’च्या चंद्रकांत पाटील यांना १ लाख १२ हजार ४१ मतांचे मताधिक्य मिळाले. जिल्ह्यातील हे सर्वात मोठे मताधिक्य ठरले आहे. पाटील यांना १ लाख ५९ हजार २३४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांना ४७ हजार १९३ मते मिळाली. पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांचा ५४ हजार ६६० मतांनी पराभव केला. त्यात मिसाळ यांना १ लाख १८ हजार १९३, तर कदम यांना ६३ हजार ५३३ मते मिळाली. वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बापूसाहेब पठारे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सुनील टिंगरे यांचा ४ हजार ७१० मतांनी पराभव केला. पठारे यांना १ लाख ३३ हजार ६८९, तर टिंगरे यांना १ लाख २८ हजार ९७९ मते मिळाली. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांचा ७ हजार १२२ मतांनी पराभव केला. तुपे यांना १ लाख ३४ हजार ८१०, तर जगताप यांना १ लाख २७ हजार ६८८ मते मिळाली.

ग्रामीण भागातील बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना १ लाख ८९९ मताधिक्य मिळून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. अजित पवार यांना १ लाख ८१ हजार १३२, तर युगेंद्र पवार यांना ८० हजार २३३ मते मिळाली. खेड आळंदी मतदारसंघात उद्धवसेनेचे बाबाजी काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दिलीप मोहिते यांना ५१ हजार ७४३ मतांनी धक्का दिला. काळे यांना १ लाख ५० हजार १५२, तर मोहिते यांना ९८ हजार ४०९ मते मिळाली. आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दिलीप वळसे पाटील यांना मिळालेले मताधिक्य हे जिल्ह्यातील सर्वात कमी मताधिक्य ठरले आहे. वळसे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देवदत्त निकम यांचा केवळ १ हजार ५२३ मतांनी पराभव केला. वळसे यांना १ लाख ६ हजार ८८८, तर निकम यांना १ लाख ५ हजार ३६५ मते मिळाली.

दौंड मतदारसंघातून भाजपचे राहुल कूल १३ हजार ८८९ मतांनी विजयी झाले. त्यांना १ लाख २० हजार ७२१, तर पराभूत उमेदवार रमेश थोरात यांना १ लाख ६ हजार ८३२ मते मिळाली. जुन्नर मतदारसंघात अपक्ष शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्यशील शेरकर यांचा ६ हजार ६६४ मतांनी पराभव केला. सोनवणे यांना ७३ हजार ३५५, तर शेरकर यांना ६६ हजार ६९१ मते मिळाली. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनील शेळके यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष बापू भेगडे यांच्यावर १ लाख ८ हजार ५६५ मतांनी मात केली. त्यात शेळके यांना १ लाख ९१ हजार २५५, तर भेगडे यांना ८२ हजार ६९० मते मिळाली. पुरंदर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी काँग्रेसच्या संजय जगताप यांच्यावर २४ हजार १८८ मतांनी मात केली. शिवतारे यांना १ लाख २५ हजार ८१९, तर जगताप यांना १ लाख १ हजार ६३१ मते मिळाली.

भोर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शंकर मांडेकर यांना १९ हजार ६३८ मताधिक्य मिळाले असून, त्यांनी काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांचा पराभव केला. मांडेकर यांना १ लाख २६ हजार ४५५ तर थोपटे यांना १ लाख ६ हजार ८१७ मते मिळाली. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ज्ञानेश्वर कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांचा ७४ हजार ५५० मतांनी पराभव केला. कटके यांना १ लाख ९२ हजार २८१ तर पवार यांना १ लाख १७ हजार ७३१ मते मिळाली.

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अण्णा बनसोडे यांना १ लाख ९ हजार २३९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत धर यांना ७२ हजार ५७५ मते मिळाली. विजयी बनसोडे यांना ३६ हजार ६६४ मते अधिक मिळाली. भोसरी मतदारसंघात भाजपच्या महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अजित गव्हाणे यांचा ६३ हजार ७६५ मतांनी पराभव केला. लांडगे यांना २ लाख १३ हजार ६२४, तर गव्हाणे यांना १ लाख ४९ हजार ८५९ मते मिळाली. चिंचवड मतदारसंघात भाजपच्या शंकर जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राहुल कलाटे यांच्यावर १ लाख ३ हजार ८६५ मतांनी मात केली. जगताप यांना २ लाख ३५ हजार ३२३, तर कलाटे यांना १ लाख ३१ हजार ४५८ मते मिळाले.

सात आमदार पराभूत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत २१ पैकी २० आमदारांना संबंधित पक्षांनी उमेदवारी दिली होती, तर चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांना तिकीट न देता त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपने तिकीट दिले होते. त्यात ते निवडून आले, तर २० विद्यमान आमदारांपैकी ६ आमदारांचा पराभव झाला आहे. त्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर, संजय जगताप व संग्राम थोपटे या तिन्ही आमदारांचा पराभव झाला, तर वडगाव शेरी, खेड आळंदी व जुन्नरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अनुक्रमे सुनील टिंगरे, दिलीप मोहिते व अतुल बेनके यांचा पराभव झाला. तसेच शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार पराभूत झाले.

लाखाहून अधिकचे लीड चौघांना

जिल्ह्यात चारजण एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले आहेत. त्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना १ लाख १२ हजार ४१, त्यानंतर मावळमधून सुनील शेळके यांना १ लाख ८ हजार ५६५, चिंचवडमधून शंकर जगताप यांना १ लाख ३ हजार ८६५ तर बारामतीमधून अजित पवार यांना १ लाख ८९९ मतांचे लीड मिळाले.

Web Title: maharashtra assembly election 2024 result mahayuti in 18 out of 21 seats in Pune 2 leading strongholds and 1 independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.