Maharashtra Assembly Election 2024 Result: पुण्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मिसाळ, कुल, लांडगे, शेळके या नव्या नावांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:29 PM2024-11-24T12:29:30+5:302024-11-24T12:30:26+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result सलग आठव्यांदा निवडून येण्याचा मान अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांना मिळाल्याने ते मंत्री होणार
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात बारामतीमधून निवडून आलेले अजित पवार, आंबेगावमधून निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहे. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी नावाची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८ आमदार, तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि १ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. सलग आठव्यांदा निवडून येण्याचा मान अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील हे मंत्री होणार आहेत. भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार आहेत. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी नावाची चर्चा आहे.
अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा झाले आमदार
बारामती मतदारसंघातून अजित पवार आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील हे आठव्यांदा, तर पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, खडकवासलातून भीमराव तापकीर हे चाैथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या विजयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.