"अरे... कसा निवडून येतो बघतोच..."; शरद पवारांनी पुन्हा उडवली अजित पवारांची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 07:43 PM2024-11-14T19:43:34+5:302024-11-14T19:55:31+5:30
घोडगंगा साखर कारखान्याबाबत बोलत असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.
Shirur Haveli Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे महाराष्ट्रभर फिरत आहेत. प्रचारसभांमधून शरद पवार हे अजित पवार यांच्यासह त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच शिरुर हवेली मतदारसंघात अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांची नक्कल केली आहे. घोडगंगा साखर कारखान्याबाबत बोलत असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक पवार यांच्या ताब्यात असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरून टीका केली होती. तसेच शिरूरमध्ये ‘कसा निवडून येतो बघतोच,’ असं म्हणत अमोल कोल्हे यांना दम दिला होता. अशोक पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना याचीच नक्कल करत शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.
शिरूरमधील सगळ्या कामांची जबाबादारी अशोक पवार यांच्या खांद्यावर दिली आहे. शिरूरमधील जनतेनं आणि अशोक पवारांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला तालुक्याची चिंता नाही. काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, काही लोक बाहेरून येतात आणि म्हणतात, ‘कसा हा कारखाना चालू होतो, हे मी बघतो… अरे… अवघड आहे…,” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली.
"लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे शिरूरमधून उभे होते. कोल्हे चांगली भाषणं देतात. तेव्हा, आमच्या एका नेत्यानं सांगितलं, कसा निवडून येतो, मी बघतोच. मात्र, यानंतर शिरूरमधील लोकांनी जबाबदारी घेतली आणि लाखोंच्या मतांनी अमोल कोल्हे निवडून आले,” असंही शरद पवारांनी म्हटलं.
घोडगंगा साखर कारखान्याबाबत एक घटना सांगताना अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना दम देण्यात आला होता असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. घोडगंगा साखर कारखाना सुरु न होण्यामागे अजित पवार कारणीभूत असल्याचा आरोपही अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी केला आहे. "मुख्यमंत्र्यांना कोणीतरी दम दिलेला दिसतोय. हे पैसे मंजूर करायचे नाहीत. ते बिचारे आमचे एकनाथ त्यांना काय झालं काय माहिती शांत झालेत. मला फक्त सांगितले समजून घ्या. काय समजून घ्यायचं," असं शरद पवार म्हणाले.