- सचिन कापसे पुणे - चंद्रकांत पाटील यांच्यासाठी २०१९च्या विधानसभेला भाजपच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांना थांबविण्यात आले होते. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली तर याच मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ केंद्रात राज्यमंत्री झाले. सुरुवातीला बंडाचा झेंडा हाती घेतलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकरही आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत कलहाचा मुद्दा मागे पडला असून आता उद्धवसेना आणि मनसेचे तगडे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहेत. चंद्रकांत मोकाटे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा मैदानात उतरवले असून किशोर शिंदे यांनी २०१९ ला पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती.
तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार? कोथरूडमध्ये २०१९ ला मनसेच्या किशोर शिंदे यांना ७९७५१ मते मिळाली होती. तेव्हा दुरंगी झालेली लढत यंदा तिरंगी होणार असून या लढतीमुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार आहे. या विभाजनाचा फटका महाआघाडीला बसेल की महायुतीला, हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?- लोकसभेला मुरलीधर मोहोळ निवडून आल्यामुळे, तसेच राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिल्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत दावेदारी संपुष्टात आली. त्यामुळे भाजप आणि इतरमित्रपक्ष एकसंधपणे पाटील यांच्यासोबत आहेत. - एकेकाळी कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा बालेकिल्ला बनला असून भाजपचे दोन खासदार या मतदारसंघात आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्देकोथरूड परिसरातील अनेक सोसायट्यांना पाणीपुरवठा आणि पार्किंगची समस्या भेडसावत असून या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. मतदारसंघात अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो.