संघर्ष पुन्हा काका-पुतण्यातच, अजित पवारांसाठी अस्तित्वाची लढाई; युगेंद्र पवारांसाठी आजोबा मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:34 AM2024-10-30T11:34:12+5:302024-10-30T11:38:23+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : अख्ख्या देशाचे लक्ष लोकसभेला बारामतीकडे होते. तीच परिस्थिती आता विधानसभेला निर्माण झाली आहे. अ
- सचिन कापसे
पुणे : बारामती विधानसभा म्हणजे अजित पवार, हे २०१९ पर्यंतचे समीकरण. या समीकरणाला धक्का बसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत. खुद्द अजित पवार यांच्या विधानसभा क्षेत्रात सुनेत्रा पवार लोकसभेला पिछाडीवर राहिल्या. तेव्हा वरवर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे वाटणारी निवडणूक थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाली. आताही अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असली तरी नातवासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे.
अख्ख्या देशाचे लक्ष लोकसभेला बारामतीकडे होते. तीच परिस्थिती आता विधानसभेला निर्माण झाली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राजकीय गणिते कमालीची बदलली आहेत. लोकसभेचे निकाल सर्वश्रुत आहेत. १९९१ पासून एकतर्फी अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात आता चित्र वेगळे आहे.
कौटुंबिक कलहात कोणाचे पारडे जड?
लोकसभेला पवार कुटुंबातील नणंद भावजयीचा सामना रंगला होता. कौटुंबिक कलहात शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा सुप्रिया सुळे यांना मिळाला आणि सुनेत्रा पवारांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. त्यामुळे आता विधानसभेला मतदार काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
- लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अजित पवार यांचे मतदारसंघातील विरोधकही या संधीचा फायदा घेऊन युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत.
- मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे यूगेंद्र यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तगडे आव्हान असणार आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
नीरा नदीच्या प्रदूषणामुळे शेतीची सुपीकता धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. या संदर्भात आतापर्यंत काहीही उपाय-योजना नाहीत. उद्योग-धंदे नसल्यामुळे मतदारसंघातील तरुणाला कामासाठी इतर शहरांमध्ये जावे लागत आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (विजयी) १,९५,६४१
गोपीचंद पडळकर भाजप ३०,३७६
अविनाश गोफणे वंचित बहुजन आघाडी ३,१११
अशोक माने - १,४२१
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
२०१४ अजित पवार राष्ट्रवादी १,५०,५८८ ६६
२००९ अजित पवार राष्ट्रवादी १,२८,५४४ ६८
२००४ अजित पवार राष्ट्रवादी ९६,३०२ —
१९९९ अजित पवार राष्ट्रवादी ८६,५०७ —
१९९५ अजित पवार राष्ट्रवादी ९१,४९३ —