Maharashtra Assembly Election 2024 : पुणे : हर्षवर्धन पाटील यांच्या सहकारी संस्थांना केंद्र सरकारने ३०० कोटी रुपये निधी म्हणून दिले, त्याचा त्यांनी योग्य वापर केला तर ठीक अन्यथा त्या पैशांच्या विनियोगाची चौकशी करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी त्या पैशांचे काय केले, असा प्रश्न जाहीर सभेत उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मोहोळ म्हणाले की , केंद्र सरकार कधीही पक्ष पाहून पैसे देत नाही.
मदत करताना किंवा कर्ज उपलब्ध करून देताना सहकार मोठा झाला पाहिजे, असाच दृष्टिकोन असतो. ते आमच्याबरोबर होते म्हणून पैसे दिले असे नाही आणि ते आता दुसरीकडे गेले म्हणून चौकशी होईल असेही नाही. मात्र मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी त्यांची आहे, तसे झाले नसेल तर मात्र चौकशी करावी लागेल.