Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 12:16 PM2024-11-22T12:16:33+5:302024-11-22T12:19:38+5:30

मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होती. यात घड्याळाची टिकटिक राहणार, की तुतारी वाजणार हे निकालातून स्पष्ट होणार

Maharashtra Assembly Election 2024 Will the clock tick or the trumpet sound in Pimpri | Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे

Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे

पिंपरी : पिंपरीत २०१९ मध्ये ५०.१७ टक्के, तर यंदा ५१.७८ टक्के मतदान झाले. यंदा १.६१ टक्के मतदान जास्त झाले. हा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला धक्का बसणार याबाबत चर्चा रंगत आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होती. यात घड्याळाची टिकटिक राहणार, की तुतारी वाजणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत पिंपरीतून ५० टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत साडेचार टक्के कमी झाले होते. विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत ५०.१७ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी एक लाख ७७ हजार ३८७ मतदारांनी हक्क बजावला होता. अण्णा बनसोडे १९ हजार ६१८ मतांनी विजयी झाले होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरून नाट्य रंगले होते. सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फाॅर्म देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर बनसोडे यांना एबी फाॅर्म देण्यात आला, तो मुद्दा यंदा प्रचारात आलाच. आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून बनसोडे यांना पुन्हा पक्षांतर्गत विरोध होता. मात्र, बनसोडे यांना उमेदवारी मिळाली. तर, शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत यांना संधी देण्यात आली.

बनसोडे यांनी लढण्याची तयारी सुरू केली होती, तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वेळ कमी असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान शिलवंत यांच्यापुढे होते. असे असतानाही प्रचारात रंगत आली. मतदानाच्या दिवशी मतदार येण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात झोपडपट्टीबहुल भागातील केंद्रांवर रांगा लागल्या. शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला.

उशिराचे मतदान निर्णायक?

पिंपरीत काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागून सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. उशिरा झालेले मतदान निर्णायक ठरणार आहे. यातून कोणाला फायदा, कोणाला फटका याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Will the clock tick or the trumpet sound in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.