Chinchwad Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला केवळ १५ दिवस उरले आहेत. उमेदवारांनीही आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याची गाडी पेटवून दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपक्ष उमेदवाराला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांनी शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. काळेवाडी पोलिसांनी याप्रकरणी विनायक ओव्हाळ यांना ताब्यात घेतलं आहे. वेळीच आग नियंत्रणात आणण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली.
या घटनेत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न का केला, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्जाबाबत दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळं ओव्हाळ यांनी गाडी पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेत विनायक ओव्हाळ यांच्यासोबत नागेश काळे आणि अजय गायकवाड हे आणखी दोघे उपस्थित होते. काळे सुद्धा दिव्यांग असून त्यांच्याच रिक्षातून ओव्हाळ हे ग प्रभागात आले होते. त्याचवेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष नाना काटे यांच्यासह फक्त सात उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.