आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:00 PM2024-10-28T18:00:52+5:302024-10-28T18:02:10+5:30

बारामती मतदारसंघात कुटुंबातीलच उमेदवार आमने-सामने आल्याने अजित पवार आज भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Ajit Pawar emotional after Yugendra Pawar filed his candidature form from Baramati Assembly Constituency | आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : बारामती विधानसभा मतदारसंघात आज महायुतीकडून अजित पवार यांनी तर महाविकास आघाडीकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणुकीनंतर पवार विरुद्ध पवार लढाईचा दुसरा अंक रंगणार, हे निश्चित झालं आहे. मात्र कुटुंबातीलच उमेदवार आमने-सामने आल्याने अजित पवार आज भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी मनातील सल बोलून दाखवली आहे.

"आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांच्या कुटुंबातले आहोत. आमची परिस्थिती आधी बिकट होती. मात्र आईने आधार दिला आणि आम्ही ही परिस्थिती सुधारली. आई आता सगळ्यांना सांगत होती की माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. पण तरीही समोरून घरातला उमेदवार दिला. या पद्धतीने जे चाललंय ते बरोबर नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

"घरातील व्यक्ती माझ्याविरोधात अर्ज भरताना मोठ्या व्यक्तींनी याबाबत सांगायला पाहिजे होतं. पण युगेंद्र पवारांना उमेदवारी अर्ज कोणी भरायला सांगितला असं विचारलं तर समोरून उत्तर आलं साहेबांना सांगितलं. म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का?" असा खरमरीत सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, "आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत. मला इतकंच सांगायचंय की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा ठेवायला पिढ्यान् पिढ्या जातात, मात्र तुटायला वेळ लागत नाही. घरातलं भांडण घरात ठेवायला पाहिजे, ते चव्हाट्यावर आणायचं काही कारण नाही. एकदा दरी पडली की ती सांधायला खूप वेळ लागतो," असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबात संघर्ष व्हायला नको होता, असं मत व्यक्त केलं आहे. 
 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Ajit Pawar emotional after Yugendra Pawar filed his candidature form from Baramati Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.