बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 10:37 AM2024-11-05T10:37:45+5:302024-11-05T10:39:37+5:30
शरद पवार हे आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत.
Sharad Pawar Baramati ( Marathi News ) : बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत रंगणार आहे. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यातच स्वत: शरद पवार यांनी युगेंद्र यांच्या विजयासाठी ताकद लावल्याने बारामतीचं राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार हे आज बारामतीत तब्बल ६ सभा आणि मेळावे घेणार आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून ते बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून धडा घेत अजित पवार यांनी आता पदाधिकाऱ्यांवर विसंबून न राहता गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला असून त्यांचा गावभेट दौरा सुरू आहे. अशातच आता युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार हेदेखील मैदानात उतरले असून ते आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचं दिसत आहे.
अजित पवारांकडूनही प्रचाराचा झंझावात
उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीनिमित्त बारामती तळ ठोकून आहेत. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अजित पवार यांनी ५९ गावांचा दौरा पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी पाडवा भेट कार्यक्रमानंतर भाऊबीजेच्या दिवशी पवार यांनी २७ गावांचा दौऱ्याला भल्या सकाळी सुरुवात केली. सकाळी ७ ला सुरु झालेला पवार यांचा दौरा रात्री सुमारे ९ वाजेपर्यंत सुरु होता. यावेळी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ते म्हणाले, लोकसभेला ताईला मतदान करून साहेबांना खुश केलं, आता खालच्या निवडणुकीत (विधानसभा निवडणुकीत) मला खुश करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवारांनी गावकऱ्यांना केले. अजित पवार म्हणाले की, गावकऱ्यांनो मला माहिती आहे. तुमच्या मनात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही बोलत नव्हता. परंतु तुमच्यात अंडर करंट होता. तेव्हा काहीजण म्हणायचे की, साहेबांच आता एवढं वय झालंय. या वयात जर सुप्रियाताई पडल्या, तर साहेबांना कसं वाटेल? मग लोकसभेला आपण ताईंना मतदान करू, असे म्हणत अजित पवार म्हणाले की, लोकसभेला जे केलं ते ठीक आहे. ते मी स्वीकारलं. लोकसभेला ताईंना मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केलं. बारामतीकरांवर माझाही तेवढाच अधिकार आहे. आता विधानसभेला खालची निवडणूक आहे. तर या निवडणुकीत दादाला खुश करा, असं मिश्कील वक्तव्य त्यांनी केले. त्यावर उपस्थितांमध्येही हशा पिकला. "साहेब जरी आले तरी तुम्ही साहेबांना सांगा, लोकसभेला तुमचं काम केलं. तुम्हाला खुश केलं. आता ' दादा' काम करतात. आता त्यांना खुश करू आणि बारामती तालुक्याचा विकास आप आपल्या परीने करू," असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.