बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:09 AM2024-11-20T08:09:26+5:302024-11-20T08:10:37+5:30
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी आज आपल्या काटेवाडी या गावी मतदानाचा हक्क बजावला. तसंच सर्व मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर करत मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत असताना हे राज्य कोणाच्या हातात द्यायचं याबाबतचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. योग्य उमेदवारांना जनतेने ज्या त्या मतदारसंघात विजयी करावं आणि महाराष्ट्राची घोडदौड सातत्याने पुढे राहील, असा प्रयत्न करावा," असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांच्या मतदानाविषयीही पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, त्यांचं वय ८५ हून जास्त असल्याने त्यांनी १७ नोव्हेंबर रोजीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
मताधिक्याविषयी काय म्हणाले अजित पवार?
बारामतीत बऱ्याच वर्षांनंतर दोन तुल्यबळ उमेदवार आमने-सामने असल्याने या लढतीत कोणाचा विजय होणार, याबाबत उत्सुकता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, "मताधिक्याचा निर्णय बारामतीकर घेतील," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.