पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:11 PM2024-10-28T16:11:38+5:302024-10-28T16:12:16+5:30

वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापू पठारे उभे आहेत.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 How many seats are Ajiit pawar and sharad pawar parties contesting the election in pune | पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?

पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?

Vidhan Sabha Election ( Marathi News ) : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अजित पवार गट आणि ज्येष्ठ नेते शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आणि यंदा प्रथमच या दोन्ही नेत्यांचे पक्ष विधानसभा निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट दोन जागा, तर शरद पवार गट चार जागा लढवत आहे. शहरातील वडगावशेरी मतदारसंघ आणि हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. पर्वती आणि खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) आणि भाजप उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अस्तित्त्वाची लढाई आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट ही महायुती म्हणून एकत्र लढली, तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट ही महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे गेले होते. आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर प्रथमच सामोरे जात आहे. वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापू पठारे उभे आहेत. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उभे आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ आणि शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांच्यात, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर-सचिन दोडके (रा.कॉ. शरद पवार गट) यांच्यात लढत होणार आहे.

राष्ट्रवादीला बंडखोरीचे ग्रहण 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आनंद अलकुंटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील लोकांनी एकत्रित येऊन हडपसर विकास आघाडी स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरोधात हडपसर विकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी प्रशांत जगताप यांनी तुपे यांचे काम केले होते; पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट पडले. या मतदारसंघात चेतन तुपे यांच्याविरोधात प्रशांत जगताप उभे राहिले आहे. त्यामुळे गेल्यावेळेस एकत्र कामे केलेले आता एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 How many seats are Ajiit pawar and sharad pawar parties contesting the election in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.