Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा उल्लेख करत सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं.अजित पवारांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर आता प्रदेशाध्यक्षव जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. भाजपने अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याचे जयंत पाटील म्हणाले. या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान,आता खासदार सुनिल तटकरे यांनी जयंत पाटील यांना इशारा दिला आहे.
बारामती येथे आज सुनिल तटकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, २०१४ मध्ये आम्ही भाजपाला निकाल पूर्ण हाती येण्याअगोदर बाहेरुन पाठिंबा जाहीर केला. तो पाठिंबा जाहीर करत असताना मी स्वत: 'सिल्वर ओक'वरील बैठकीला उपस्थित होतो. या बैठकील छगन भुजबळ, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार होते. त्या बैठकीलमध्ये जयंत पाटील नव्हते, त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहित नसतील. २०१४ मध्ये लोकसभेच्याआधी सुद्धा १६, १६, १६ अशा जागांचं सुद्धा वाटप झालेले होते.नंतर आम्ही २०१६,१७ मध्ये सत्तेत सहभागी होणार होतो, त्यावेळी जयंत पाटील यांना कोणत खातं मिळणार हे माहित होतं, त्यामुळे अशा गोष्टींची टीका टिप्पणी करण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगाव्या. मलाही अनेक गोष्टी ज्ञात आहेत. विनाकारण अजित पवार यांना विलन करण्याचा जर कोण प्रयत्न करणार असेल तर पक्षांतर अनेक गोष्टी ज्या घडल्या आहेत, त्या सांगाव्या लागतील, असा इशारा सुनिल तटकरे यांनी जयंत पाटील यांना दिला.
"आज दिवाळी आहे, टीका टिप्पणी करण्यापेक्षा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असंही तटकरे म्हणाले. २३ नोव्हेंबरला बारामती विधानसभेचा निकाल लागेल. त्यावेळी महाराष्ट्रातील जनता कोण चुकले हे दाखवून देईल. बारामतीमध्ये अजित पवार यांचा मोठा विजय होईल, असंही सुनिल तटकरे म्हणाले. ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्र स्पष्ट होईल, २३ नोव्हेंबरला मोठा बॉम्ब फुटेल, असंही तटकरे म्हणाले.